निवडणुकीच्या कामात व्यस्त असणाऱ्या जालन्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिका १२ डी उपलब्ध

जालना, ५ एप्रिल २०२४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात १३ मे २०२४ रोजी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी निवडणूक कामात व्यस्त असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा बहुमुल्य हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टपाली मतपत्रिका १२ डी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तरी टपाली मतपत्रिका १२ डी उपलब्ध करुन देणेकामी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कार्यालयातील संबंधित एका अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी, अशा सुचना उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी (पोस्टल बॅलेट) पदमाकर गायकवाड यांनी बैठकीत दिल्या. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, नायब तहसीलदार तुषार निकम, विक्रांत मोंढे यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

उपजिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, जालना‍ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी जालना जिल्ह्यात १३ मे २०२४ रोजी विविध मतदान केंद्रावर मतदान करण्यात येणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कामानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बहुमुल्य मत नोंद करणे गरजेचे आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकारी (पोस्टल बॅलेट) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोस्टल व्होटींग सेंटरला येवून मतदान करावे लागणार आहे. पुर्णवेळ कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी मतदानाची तीन दिवस सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टपाली मतपत्रिका १२ डी भाग-१ मध्ये मतदान तर भाग-२ मध्ये घोषणापत्र असणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या कार्यालयातील नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माहितीची देवाण-घेवाण प्रमुख उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नोडल अधिकारी (पोस्टल बॅलेट) यांच्याशी करावयाची आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान हे जालना जिल्ह्यात १३ मे २०२४ रोजी होणार असून इतर जिल्ह्यात याच दिवशी मतदान होणार असलेल्या जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच हे लागू होईल. तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मतदान असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबंधित कार्यालय प्रमुखांनी राष्ट्रीय कार्य असलेल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी एका दिवसाची सुट्टी द्यावी, अशा सुचनाही बैठकीत त्यांनी दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा