मुंबई, १३ मे २०२३: भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची प्रतिमा मलिन केल्याबाबत मुंबई पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. परवानगीशिवाय सचिनचे नाव, फोटो आणि आवाजाचा वापर केल्याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन तेंडुलकरच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सचिनच्या स्वीय सहाय्यकाने हा गुन्हा दाखल केला आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, ५ मे रोजी फेसबुकवर एका तेल कंपनीची जाहिरात होती, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा फोटो लावला आहे आणि त्यासोबत क्रिकेटर सचिनने या उत्पादनाची प्रशंसा केली असल्याचे लिहिले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर या जाहिराती पाहण्यात आल्या आहेत.
मुंबई क्राइम ब्रँचला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे सचिन तेंडुलकर अशा कोणत्याही उत्पादनाला मान्यता देत नाही. या जाहिरातीत सचिन तेंडुलकरच्या आवाजाचा गैरवापर करण्यात आला आहे, तसेच त्यांच्या छायाचित्रांचाही गैरवापर केला जात आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर, गुन्हे शाखेने या प्रकरणी आयपीसीच्या विविध कलम ४२०, ४६५ आणि ५०० नुसार फसवणूक, बनावटगिरी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड