संगमनेर, ३१ मे २०२३ : निळवंडे धरण आणि कालव्यांच्या बाबतीत काहीजण श्रेय घेत आहेत, ते घेऊ द्या. निळवंडे धरण कोणी केले, हे सर्व जनतेला माहित आहे. त्यामुळे त्यांचे वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. या कालव्यांद्धारे चाचणी करिता तरी डाव्या कालव्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते दुष्काळी भागातील जनतेला पाणी सोडले जात असल्याचा आनंद आहे, असं कॉग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
थोरात म्हणाले की, पावसाळा तोंडावर आला असताना भंडारदरा आणि निळवंडे धरणात सध्या १० टीएमसी पाणी शिल्लक आहे. ते पाणी दुष्काळी भागाला सोडणे गरजेचे आहे. पुढील वर्ष दुष्काळाचे आहे. त्यामुळे पुढचा धोका लक्षात घेऊन डाव्या कालव्यातून दुष्काळी भागातील जनतेसाठी पाणी सोडले पाहिजे, असा आग्रह आपण सरकारकडे धरला होता. तो त्यांनी मान्य केले असल्याचे थोरात यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी भागातील अनेक पिढ्यांनी निळवंडे धरण व्हावे आणि जनतेपर्यंत पाणी पाटाने यावे यासाठी आंदोलन केले. तसेच मोर्चे, उपोषण करत पाणी परिषदा घेतल्या. त्यांच्या या कष्टाला फळ आलं असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचणी करिता पाणी सोडले जात आहे. दुष्काळी भागातील जनतेचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर