पुणे १८ जून २०२३: पुणे शहराचा चौफेर विस्तार झाल्यामुळे, नागरीकरण आणि ट्रॉफीकच्या समस्या वाढल्या. पुण्यामध्ये आता रिंगरोडही प्रस्तावित आहे. पुणेमहानगरपालिकेत २०२१ मध्ये समावेश झालेल्या, पुण्यालगतच्या २३ गावांना आता मोठी लॉटरी लागली आहे. या गावातील विकास कामांसाठी तब्बल १४०० कोटी रुपये मनपाने दिले आहेत.
या समाविष्ट गावांचा आता चौफेर विकास तसेच गावात अनेक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहे. यामुळे मनपात समावेश होऊन विकास होत नाही, हा आरोप आता या गावातील नागरिकांना करता येणार नाही.
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांतील आजवर रखडलेली विकासाची कामे आता मार्गी लागणार आहेत. पुणे मनपात समाविष्ट गावात एकूण १५००० चेंबर्स आणि २०४ किलोमीटरच्या ड्रेनेज लाईन उभारण्यात येणार आहेत. जायका प्रकल्पातील ११ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाबरोबरच, नव्या २३ गावांमध्ये विविध प्रकल्प उभारण्यात येणार आहे, तसेच शहरातील देखील ६ शुद्धीकरण प्रकल्पाचे नूतनीकरण होणार आहे.
मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी नव्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. पुणे महापालिकेकडून या प्रकल्पांना १४०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
न्यूज अन कट प्रतिनिधी- अनिल खळदकर