पुण्याची लालपरी अडचणीत! प्रवाशांचा जीव टांगणीला, २०० बसची गरज, मिळाल्या फक्त ३०!

27

पुणे, ४ मार्च २०२५: पुणे विभागातील एसटी बससेवा सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. राज्याच्या महसुलात सर्वाधिक योगदान देणाऱ्या या विभागाला बसच्या तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि जुन्या गाड्यांमुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे.

एसटी प्रशासनाने २०० नवीन बसची मागणी केली होती, पण त्यांना केवळ ३० बस मिळाल्या आहेत. त्याही बारामती, दौंड आणि इंदापूर या ग्रामीण भागातील आगारांना प्रत्येकी १० बस देण्यात आल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर यांसारख्या मोठ्या आगारांना मात्र नव्या बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या जुन्या गाड्यांमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

पुणे विभाग हा राज्याच्या महसुलात सर्वाधिक योगदान देणारा विभाग आहे. इथे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, बसची कमतरता असल्याने प्रशासनाला नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर जुन्या गाड्या धावत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, पुणे विभागाला आणखी बस मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे.

आगार आणि मिळालेल्या बसची आकडेवारी

  • बारामती: १०
  • दौंड: १०
  • इंदापूर: १०

प्रतिक्रिया

“पुणे विभागाला २०० बसची गरज आहे, अशी मागणी केली होती. सध्या ३० बस मिळाल्या आहेत. अजून बस मिळण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी सुरू आहे,” असे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा