देवाभाऊंचा गृहपाठ कच्चा

13
नंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे या मंत्र्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी कोंडी करू नये, म्हणून आझमी यांच्या औरंगजेबाच्या मुद्द्याला सत्ताधाऱ्यांनी उचलून धरले. हे करताना एरव्ही अभ्यासू समजल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहपाठ कच्चा असल्याचे दिसले.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या केलेल्या उदात्तीकरणानंतर विधिमंडळात जे घडले, ते नक्कीच चांगले नाही. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे या मंत्र्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी कोंडी करू नये, म्हणून आझमी यांच्या औरंगजेबाच्या मुद्द्याला सत्ताधाऱ्यांनी उचलून धरले. हे करताना एरव्ही अभ्यासू समजल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहपाठ कच्चा असल्याचे दिसले.

मोगल साम्राज्यवादी शक्तीचा मुकाबला केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले पाहिजे. त्यांची राजवट सामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी सक्त ताकीद सैन्याला होती. आता तर सत्तेत एका परदेशी कंपनीकडे कशी लाच मागितली जाते, हे उच्च न्यायालयातील याचिकेवरून स्पष्ट होते. शिवाजी महराजांच्या काळात महिला सुरक्षित होत्या. आता दररोज नव्वद महिलांवर अत्याचार होतात. शिवाजी महाराजांनी मराठा समाजाचे राज्य आणले नव्हते, त्यांचे राज्य रयतेचे होते. शिवाजी महाराज हे कल्पक वास्तुविशारद, युद्ध शास्त्राचे निपूण, कल्पक संयोजक, व्यवस्थापन गुरू होते. चुकीचे वागणारे कितीही जवळचे असले, तरी त्यांना शिवाजी महाराजांनी दयामाया दाखवली नाही.

आता तर आयात नेत्यांच्या स्वच्छतेसाठी अहमदाबादची वॉशिंग पावडर वापरावी लागते. साधन शूचितेच्या गप्पा मारणारे न्यायालयाने ठपका ठेवूनही मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत आणि शिवाजी महाराजांचे सोईचे संदर्भ देऊन राजकारण करतात. त्यातही इतिहासाची मोडतोड केली जाते. आज शिवाजी महाराजांबद्दल जी काही चर्चा होते, ती त्यांच्या कार्यातून मिळालेल्या संदेशाबद्दल नसून त्यांचे स्मारक किती उंच आहे आणि त्याची उंची कोणाला कमी करायची आहे याची चर्चा आहे. इतिहास आणि ऐतिहासिक प्रतिकांवर अवलंबून राहण्याचे आजचे युग आहे. या युगात वर्तमानाच्या पोकळपणामुळे इतिहासाचा आश्रय घेतला जातो. वर्तमान प्रश्नांवर बोलण्यासारखे काही नसेल, राजकारणात भविष्याला सामोरे जाण्याची हिंमत नसेल, तर ऐतिहासिक आठवणी, प्रतिके, भाषा, आव्हाने यांच्यात लपून बसणे सोपे झाले आहे.

वर्तमानापासून पळ काढण्यासाठी आणि आपले पोकळ, अर्थहीन राजकारण लपवण्यासाठी इतिहासातील हुतात्मा, किल्लेदार, देशद्रोही, शत्रू अशी प्रतिके वापरली जातात. ज्यांना सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या धोरणांवर काम करायचे नाही, ते महापुरुषांच्या स्मारकांबद्दल बोलू लागतात. विरोधी पक्ष म्हणून अपयशी ठरलेले पक्ष चिन्हांच्या राजकारणात गुंतून पडू शकतात. संपूर्ण व्यवस्थाच बदलू पाहणारे गट इतिहासाच्या खेळात सामील होतात. कारण ते जनक्षोभाचे आंदोलनात रूपांतर करू शकले नाहीत. इतिहासात डोकावण्याची ही सक्ती पोकळ आणि लोकविरोधी राजकारणातून निर्माण झाली आहे. आजकाल कोणीही सोम्यागोम्या उठतो आणि महापुरुषांबाबत अर्वाच्य बोलतो.

आपल्या विधानामुळे काय रण माजेल याची त्याला तमा नसते; किंबहुना रण माजावे अशीच त्याची इच्छा असते. मग ते राहुल सोलापूरकर असोत, प्रशांत कोरटकर असोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड असोत, ‘एमआयएम’चे नेते ओवेसी असोत वा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी; या साऱ्या विषवल्ली आहेत. त्यांना वेळीच ठेचायला हवे; परंतु कोणी इतिहासाचे चुकीचे संदर्भ देऊन, कुणी कांदबरी, नाटकात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महापुरुषांचा अवमान करतो. त्यांना बदफैली, व्यसनी ठरवतो आणि तरीही समाज पेटून उठला, तर त्यांच्यावरच ठपका ठेवायचा, ही वृत्तीही ठेचली पाहिजे.

आझमी यांनी मोगल बादशहा औरंगजेब हा सर्वोत्कृष्ट प्रशासक होता आणि त्याच्या कारकीर्दीमध्ये सारे काही आलबेल होते, अशा प्रकारचे विधान केले. औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न त्यांना चांगलाच भोवला आहे. आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. तो क्रूर शासक नव्हता असे अकलेचे तारे तोडल्यानंतर राज्यभरातून आझमी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात होता. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी आवाजी मतदानाने आझमी यांच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमी यांना निलंबित करण्यात आले आहे.

छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही.त्यांना शंभर टक्के जेलमध्ये टाकू असे सांगून फडणवीस यांनी अकारण पंडित नेहरूंचा संदर्भ दिला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीही त्यांनी असाच संदर्भ दिला होता. इतिहासाची मोडतोड करायची, फायद्यापुरते सांगायचे असा प्रकार फडणवीस यांनी केला आहे. नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ मधून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या लिखाणाचा निषेध करणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. हे सांगताना फडणवीस यांचा गृहपाठ पाच महिन्यांनंतरही कच्चा आहे, हे स्पष्ट झाले. मुळात शिवाजी महाराजांविषयी नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’त नव्हे, तर ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’मध्ये लिहिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे लिहिल्याची जाणीव त्यांना झाल्यानंतर नेहरूंनी माफी मागितली आणि पुस्तकाच्या नंतरच्या आवृत्तीत सुधारणाही केली. हे फडणवीस यांनी सांगितले नाही. सहा महिन्यांत दोनदा त्यांनी नेहरूंवर शिवाजी महाराजांवरील कथित अवमानाचा उल्लेख केला. उलट ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात पंडित नेहरूंनी छत्रपती शिवरायांचे कौतुक करून त्यांना नायक म्हणून सादर केले होते. नेहरू यांनी १९३४ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ या खंड १ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लेख लिहिला होता. छत्रपती शिवाजींबद्दल आपले मत व्यक्त करताना पंडित नेहरूंनी ‘द शीख अँड मराठा’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या अध्याय ९१ मधील पृष्ठ ५०१ आणि ५०२ वर लिहिले होते, की आपल्या शत्रूंसोबत, तो (शिवाजी) आपले ध्येय साध्य करण्यासाठी चांगले किंवा वाईट कोणतेही मार्ग अवलंबण्यास तयार होता. त्याने एका सेनापतीचा विश्वासघात करून विजापूरला पाठवले. शिवाजीच्या काही कृती, जसे की विजापूरच्या सेनापतीचा विश्वासघातकी खून, आम्हाला त्यांच्याबद्दल कमी आदर वाटतो.

हे पुस्तक १९३४ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर पंडित नेहरूंवर सर्वत्र टीका सुरू झाली आणि १९३६ मध्ये मामा साहिब म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस नेते टी. आर. देवगीरकर यांनी पंडित नेहरूंना पत्र लिहून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे मराठी लेखकांचे लेख पाठवले होते. त्यानंतर २६ मार्च १९३६ रोजी पंडित नेहरूंनी देवगीरकर यांना पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या लेखावरून मुंबईतील माध्यमे त्यांचा विरोध करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे आणि त्यांचा लेख चुकीचा आहे असे त्यांचे मत असल्याचे स्पष्ट केले. पंडित नेहरू यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते, की हे पुस्तक तुरुंगात लिहिण्यात आले. तिथे त्यांच्याकडे ना संदर्भ ग्रंथ होता, ना कुठलेही ज्ञान. त्यामुळे त्यांनी सर्व काही स्मृती आणि जुन्या टिप्पणांच्या आधारे लिहिले. ते अत्यंत चुकीचे आहे. आपली चूक मान्य करण्याबरोबरच पंडित नेहरूंनी आपल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या घटनेशी संबंधित वादग्रस्त भाग काढून टाकणार असल्याची माहिती दिली होती.

नेहरू यांनी लिहिलेले हे पत्र ‘सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू’ या पुस्तकाच्या खंड ७ मध्ये नोंदवले गेले आहे. पंडित नेहरूंच्या या पत्रानंतर १९३९ मध्ये ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला. छत्रपती शिवरायांवर लिहिलेल्या लेखामुळे आज पंडित नेहरूंवर जशी टीका होत आहे, तशीच त्यांच्या हयातीतही अनेकदा झाली आणि त्यांनी अनेकदा खुलासाही केला. पुस्तक लिहिताना त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे ज्ञान मर्यादित होते आणि त्या वेळी त्यांनी केवळ विदेशी इतिहासकारांचे वाचन केले होते; पण जेव्हा त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी अधिक वस्तुनिष्ठ माहिती मिळाली, तेव्हा त्यांचे मत बदलले. पंडित नेहरूंनी पत्रात म्हटले आहे, की त्यांना शिवाजी महाराज आवडत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल.

त्यांनी नेहमीच शिवाजी महाराजांचे खूप कौतुक केले. नेहरू प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्‌घाटन करायला ३० नोव्हेंबर १९५८ रोजी महाराष्ट्रात आले होते. या वेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन चालू होते. थोडा अभ्यास केला असता तर समजले असते; पण आपला अभ्यास शनिवार वाड्याच्या पेशवाई भिंतीच्या पलीकडे जायला तयारच नाही. प्रतापगडावर नेहरू जाताना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांनी नेहरूंविरोधात ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानासाठी त्या घोषणा नव्हत्याच. नेहरूंच्या हस्ते उद्‌घाटन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही ऊन, वारा, पाऊस झेलत आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यासारखा तो आठ महिन्यात कोसळला नाही. शिवभक्ती गुणवत्तेतूनही सिद्ध होत असते. नेहरू यांना मराठमोळा फेटा परिधान करता येत नव्हता. म्हणून क्षात्रजगत्‌‍गुरू बेनावडीकर पाटील यांनी त्यांच्या डोक्यावर स्वतःचा फेटा ठेवला.

या सत्काराने व जमलेल्या महाराष्ट्रीयन जनसमुदायामुळे नेहरू भारावून गेले होते. जमलेल्या विराट जनसमुदायाच्या समोर त्यांनी मोठ्या आदराने व नम्रतेने आपण शिवरायावर इंग्रजीत काही विधाने केली होती, ती चुकीच्या गृहितकावर होती हे प्रांजलपणे मान्य केले होते. पंडित नेहरू हे हट्टी व हेकट नव्हते. त्यांच्याकडे समजुतदारपणा होता व दूरदृष्टी होती. शिवरायाबद्दल नेहरूंना विशेष आदर होता. याच भाषणात ते म्हणतात, ‘शिवराय हे केवळ महाराष्ट्र नव्हे, तर पूर्ण भारताचे महापुरुष आहेत. प्रत्येक जाती धर्म प्रांताच्या लोकांसाठी ते आदर्श आहेत.’ आपली चूक मान्य करण्याचा शहाणपणा व माणूसपणा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी सदानकदा पिसाळलेल्या लोकांकडे किती असतो हा संशोधनाचा विषय आहे. अपुऱ्या साधनांमुळे व पुराव्यामूळे भले भले वस्तुनिष्ठ इतिहासकार चुकतात. वा.सी बेंद्रे यांचे छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र येईपर्यंत काय, तर त्यांनंतरही संभाजी महाराजांची कुचाळकी थांबली नाही. वसंत कानेटकर बदनामीची विषमात्रा उगाळत राहिले. त्यांच्या शिवशाहीचा शोध या पुस्तकात त्यानी संभाजी राजावर घाणेरडे आरोप केले आहेत. त्यावर कधी कानेटकर यांनी माफी मागितल्याचे ऐकिवात नाही.  नेहरूंचा निषेध करण्याचा आग्रह धरणारे कानेटकर, सोलापूरकर, आचार्य किशोरजी व्यास (गोविंददेवगिरी महाराज), भगतसिंह कोश्यारी, बाबासाहेब पुरंदरे  यांनी इतिहासाशी केलेल्या छेडछाडीबद्दल त्यांचाही निषेध करणार का, हा खरा प्रश्न आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, भागा वरखाडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा