

एकेकाळी उत्तर प्रदेशासारख्या राज्यावर सत्ता गाजवलेल्या आणि पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या मायावती यांची धरसोड वृत्ती आणि हुकूमशाही नेतृत्वामुळे चांगले सहकारी गमावले. उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यात अवघा एक आमदार असलेल्या मायावतींनी पक्ष रसातळाला नेला आहे. अगोदर कौटुंबिक नियुक्त्या आणि नंतर त्यावरून वाद होत आहेत.पक्षाला दिशा देऊ शकणारे आपल्याच नेतृत्वाला आव्हान निर्माण करतील, की काय या भयगंडाने मायावती पछाडल्या आहेत. त्यातून त्यांनी आता घेतलेले निर्णय पक्षात अस्वस्थता निर्माण करणारे आहेत.
बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सुप्रीमो मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंदला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आधी त्यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवण्यात आले आणि आता त्यांची बसपतून हकालपट्टी करण्यात आली. मायावतींचा हा निर्णय अचानक आला असला, तरी त्यामागे दीर्घकाळ चाललेले अंतर्गत मतभेद असल्याचे मानले जात आहे. मायावतींनी आकाश यांची पक्षातून हकालपट्टी तर केलीच; पण त्याच्यावर वैयक्तिक हल्लाही केला. चुकांचे प्रायश्चित्त करण्याऐवजी आकाश यांनी अहंकार दाखवला आणि तो सासरे अशोक सिद्धार्थसारखा वागू लागला, असा मायावती यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आकाश आनंद यांच्या जागी मायावतींनी आकाश यांचे वडील आणि भाऊ आनंद कुमार यांना राष्ट्रीय समन्वयक बनवले; परंतु त्यांनीही राजीनामा दिला आहे.
रामजी गौतम यांच्यावरही समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे बसपमधील आकाश आनंद यांची इनिंग संपुष्टात आली आहे. आकाश आनंद यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. त्याची चिन्हे आधीच दिसू लागली होती. २०२३ मध्ये आकाश आनंद यांनी केलेल्या भाषणामुळे त्याची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये दिलेल्या भाषणात आकाश यांनी बसपच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते, की बसपमध्ये अनेक चुकीचे लोक मोठ्या पदांवर आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पक्षात अनेक समस्या आहेत, त्यावर उपाय शोधले पाहिजेत. या भाषणानंतर मायावती आणि आकाश आनंद यांच्यातील मतभेद वाढू लागले.
पक्षाच्या सूत्रांनुसार, आकाश यांच्या विधानाने मायावती नाराज झाल्या. बसपमधील कोणताही नेता उघडपणे पक्ष किंवा त्याच्या कार्यप्रणालीविरुद्ध भाष्य करत नाही. आकाश आनंद यांनी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी हे भाषण दिले. तेव्हा मायावती त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करणार होत्या. आपल्या २२ मिनिटांच्या भाषणात आकाश यांनी कार्यकर्त्यांना विचारले होते, की बसपमध्ये उच्च पदावर असलेले काही लोक बाहेरील लोकांपेक्षा पक्षाचे जास्त नुकसान करत आहेत, असे त्यांना वाटते का? पात्र लोकांना योग्य जबाबदारी मिळत नाही का? या विधानाने कार्यकर्ते उत्साहित दिसत होते; परंतु बसपच्या वरिष्ठ नेत्यांचा एक गट यामुळे अस्वस्थ झाला. इतकेच नाही तर आकाश आनंद अनेकदा पक्षाच्या धोरणाच्या पलीकडे जाऊन आक्रमक वृत्ती स्वीकारताना दिसले.
बसपमध्ये मायावती वगळता अन्य कोणत्याही नेत्याला स्वतःची राजकीय दिशा ठरवण्याची मुभा नाही. पक्षातील समस्यांची माहिती मायावतींपर्यंत पोहोचली आहे; मात्र समस्या सुटणार नाही. त्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील, असे आकाश आनंद यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. इतर पक्षांमध्येही झपाट्याने बदल होतात. ‘सोशल मीडिया’ आणि युवा संघटना सक्रिय झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. बसपलाही या दिशेने वेगाने वाटचाल करावी लागणार आहे. पक्षाला दिशा देणारे वक्तव्य त्यांनी केले होते; परंतु ते मायावती यांना रुचले नाही. मायावती यांचे पक्षावर पूर्ण नियंत्रण असून त्यांची कार्यशैली अत्यंत कठोर मानली जाते. त्यांनी पक्षावर नेहमीच वैयक्तिक नियंत्रण ठेवले असून इतर कोणत्याही नेत्याला त्यांनी फारसे स्वातंत्र्य दिलेले नाही. अशा स्थितीत आकाश आनंद यांची पक्षांतर्गत बदलाची चर्चा आणि उघडपणे वरिष्ठ नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हेच त्यांच्या जाण्याचे कारण ठरले.
आता बसपमध्ये स्पष्ट झाले आहे, की मायावती कोणत्याही प्रकारची बंडखोरी खपवून घेणार नाहीत, मग ती त्यांच्याच कुटुंबातून आली तरी! आकाश आनंद यांच्या हकालपट्टीनंतर भविष्यात ते स्वत:चा राजकीय मार्ग ठरवणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचवेळी मायावतींनी पक्षाचे नेतृत्व आपल्याच ताब्यात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षात सर्व काही ठीक चाललेले नाही. मायावती यांनी भाचा आकाश आनंद यांना कोणत्या आधारावर सर्व पदांवरून काढून पक्षातून काढून टाकले, याची आता दुसऱ्या स्तरावर चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीत किती तथ्य आहे, याची पडताळणी केली जात आहे. यात काही अनियमितता आढळून आल्यास पक्षांतर्गत गटबाजी होऊ शकते. काही मोठ्या जुन्या नेत्यांचे पंख छाटले जाऊ शकतात आणि काहींची पक्षातून हकालपट्टीही होऊ शकते. तीन दिवसांत मायावतींनी भाऊ आनंद कुमार यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवून सहारनपूरच्या रणधीर बेनीवाल यांच्याकडे ही जबाबदारी दिली.
आता रामजी गौतम आणि रणधीर बेनिवाल हे बसपचे राष्ट्रीय समन्वयक असतील आणि दोघेही मायावतींच्या सूचनेनुसार थेट काम करतील आणि त्यांना अहवाल देतील. मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली ते थेट देशातील विविध राज्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळतील. हे लोक पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करतील, अशी पक्षाला आशा आहे. आनंद कुमार यांना मुलगा आकाश आनंद यांच्याकडून हे पद घेऊन ते स्वत:कडे ठेवायचे नव्हते, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. यावरून कुटुंबात तणावाचे वातावरण आहे. यासोबतच आनंद यांची तब्येतही ठीक नाही. त्यांनी स्वत: मायावती यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवण्याची विनंती केली, कारण प्रकृती खालावल्यामुळे ते सतत राज्यांना भेट देऊ शकत नाहीत. त्यामुळेच ते आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू शकत नाही. त्यामुळे मायावतींनी त्यांना या पदावरून दूर केले असल्याचे मानले जात आहे.
आकाश आनंद यांना यापूर्वी सर्व पदांवरून मुक्त करण्यात आले होते. आकाश आनंद यांच्यावर मायावती यांनी इतका विश्वास ठेवला, की त्यांनी आपला उत्तराधिकारीही घोषित केला, त्यालाच आता पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता तर मी जिवंत असेपर्यंत पक्षाचा कोणीही उत्तराधिकारी असणार नाही, असे मायावती यांनी स्पष्ट केले आहे. आमचे काही अधिकारी आम्हाला काम करण्यास परवानगी देत नाहीत किंवा मलाही या ठिकाणी बसून खूप त्रास होत आहे. पक्षाची रचनाच अशी असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असे आकाश आनंद म्हणाले होते. त्यातून त्यांचा नेतृत्वावर हल्ला करण्याचा स्पष्ट हेतू दिसत होता. काही लोकांना आपण हलवू शकत नाही.
ते आमच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांची अनेक ठिकाणी चूक आहे; पण आम्ही त्यांना छेडणार नाही. आम्ही स्वतःला बळकट करू आणि त्यावर पुन्हा काम करू. आम्ही पक्षाची पुनर्बांधणी करू, बहेनजींच्या मार्गदर्शनाने आम्ही असे तंत्रज्ञान आणू ज्याद्वारे तुम्ही सर्वजण बहेनजींशी थेट बोलू शकाल, त्यांचे हे वक्तव्य मायावती यांच्या जवळच्या चांडाळ चौकडीविरोधात होते; परंतु त्यात मायावती यांच्यावरही टीका होती. मायावती यांच्यावर भाजपला मदत केल्याचा आरोप अनेकवेळा झाला. त्यामुळे पक्षाची ही अवस्था झाली आहे.
आकाश आनंद हा पक्षातील प्रमुख नेत्यांचा संदर्भ देत होता, असे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. त्याचेच परिणाम त्यांना भोगावे लागले. सध्या बसपमध्ये जे काही चालले आहे ते पाहता हे संपूर्ण प्रकरण आकाश आनंद यांच्याभोवती फिरत आहे असे दिसते; परंतु दिसते तसे नसते. मायावती यांनी अनेकांना अजमावले; पण त्यांना हवी ती ठिणगी फक्त आकाश आनंदमध्येच सापडली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा आकाश आनंद यांच्याकडून सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या, तेव्हा मायावती यांनी आकाश आनंद यांना संरक्षण देण्याची व्यवस्था केली होती. आकाश आनंद यांच्यावरील ताजी कारवाईही बसपच्या राजकारणाची कायमस्वरूपी अभिव्यक्ती नाही. मायावती यांनी भाचा आणि भावावर केलेल्या कारवाईचा बसपमधील कोणत्या नेत्यांना फटका बसणार, हे पाहावे लागेल. मायावती यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एकाच वेळी अनेक संदेश द्यायचे आहेत. बसपमध्ये प्रत्येकाला समान जबाबदाऱ्या आणि अधिकार आहेत, असा संदेशही यातून देण्यात आला आहे. बसपमध्ये कोणावरही कारवाई केली जाऊ शकते आणि कोणत्याही परिस्थितीत घराणेशाही चालत नाही.
बसपमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी त्यातून दिला आहे. कांशीराम यांच्या वारसाबद्दल चर्चा सुरू झाली आणि मायावती कांशीराम यांच्या वारसदार राहिल्या म्हणून आकाश आनंद यांना बलिदान द्यावे लागले. नगीनाचे खासदार चंद्रशेखर आझाद हेही बसप संस्थापक कांशीराम यांच्या वारशावर लक्ष ठेवून आहेत. आझाद हे स्वतःला कांशीराम यांच्या राजकारणाचे खरे वारसदार असल्याचा दावा करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी मायावती यांच्यावर बहुजन मिशनपासून विचलित केल्याचा ठपका ठेवला आहे.
आझाद यांनी नगीनामधून निवडणूक जिंकल्यानंतरच मायावतींनी आकाश आनंद यांना पद आणि जबाबदारी परत केली; पण पोटनिवडणूक आणि दिल्ली निवडणुकीत बसपला काहीही मिळाले नाही. अशा स्थितीत मायावतींना वाटले असेल, की चंद्रशेखर वेगाने प्रगती करत आहेत आणि त्यांचा उत्तराधिकारी बनवलेले आकाश आनंद योग्य प्रकारे सामना करू शकत नाहीत. आकाश आनंद यांचे हातही बांधलेले होते. त्यांना त्याला मुक्तपणे कारभार करण्याची संधी फार कमी मिळाली. कांशीराम यांच्या वारशावरून चंद्रशेखर आणि आकाश आनंद यांच्यात तुलना झाली असती, तर बसप कमकुवत होण्याचा धोका होता; पण आता चंद्रशेखर यांची तुलना मायावतींसोबत केली जाईल, त्यात ते कुठेही उभे राहू शकणार नाहीत. तोपर्यंत आकाश आनंद यांना बाहेर करण्यात आले असावे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, भागा वरखाडे