Kondhava Katraj : कात्रज-कोंढवा परिसरातील पाणीप्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांनी प्रशासनासमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीत आठवडाभरात पाणीप्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच प्रभाग ३८,४१ आणि समाविष्ट गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्याने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, उंड्री, पिसोळी, कात्रज, मोहम्मदवाडी येथील नागरिकांनी दिवसाआड आणि कमी दाबाने येणारे पाणी, तसेच अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाला जाब विचारला.
आमदार टिळेकर यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर पाणीप्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ‘पाण्याची गरज आणि उपलब्धता’ यावर पुढील काही दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, या भागातील पाणीप्रश्नासाठी आपण आणि कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगला असून, नागरिकांच्या समस्यांची आपल्याला जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. २००७ पासून या भागात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.त्यामुळे आतापर्यंत ६ पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले आहे. तरीही, नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, सर्व पंपिंग स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन पाणीपुरवठ्यातील अडचणी समजून घेतल्या जातील. त्यातून मार्ग काढून अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
या बैठकीत माजी नगरसेविका रंजना टिळेकर, वृषाली कामठे, मनीषा कदम, विरसेन जगताप आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे