Good news for Pune residents: पुणेकरांच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे. कात्रज चौकातील रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम आता वेगाने सुरू झाले असून, ते डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी दिली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांसह उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला.
भूसंपादन आणि वाहतूक नियोजनातील अडचणींमुळे या उड्डाणपुलाचे काम रखडले होते. मात्र, आता हे काम मार्गी लागले असून, खांबांवर गर्डर टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. आमदार टिळेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि ठेकेदार यांना कामात अधिक गती आणण्याचे आणि ते गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांनी सांगितले की, “पिलरवर गर्डर टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. गर्डर तयार आहेत. पालिका प्रशासनाने उड्डाणपूल उतरण्याच्या ठिकाणची जागा ताब्यात दिल्यास पावसाळ्यापूर्वी भराव टाकण्याचे काम पूर्ण होईल.” कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाबाबतही आमदार टिळेकर यांनी लक्ष वेधले. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राज्य सरकारने १४० कोटी रुपये निधी दिला आहे. मात्र, तरीही कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी मांडणार असल्याचे सांगितले.
या पाहणी दौऱ्यात प्रभाकर कदम, माजी नगरसेविका वृषाली कामठे, तुषार कदम, विकास फाटे, राजू कदम, पालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, सहायक पोलिस निरीक्षक वाहतूक शिल्पा लंबे, पाणीपुरवठा अधिकारी श्रीकांत वायदंडे, सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाणे आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे