सामान्य शेतकरी कुटुंबातील हिऱ्याची चमक! पानशेतच्या शिवांशने पहिल्याच प्रयत्नात ‘आयएएस’ बनून रचला इतिहास!

25
UPSC topper without coaching Shivansh Jagade success story.
पहिल्याच प्रयत्नात 'आयएएस' बनून रचला इतिहास;

UPSC topper without coaching Shivansh Jagade success story: पुणे जिल्ह्यातील पानशेतच्या डोंगरकपारीत वसलेल्या रुळे या छोट्याशा गावातून एक प्रेरणादायी यशोगाथा समोर आली आहे. येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील २२ वर्षीय युवा शेतकऱ्याचा मुलगा, शिवांश जागडे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवले आहे.

त्याने देशात २६ वा क्रमांक पटकावून केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
शिवांशचे वडील शेती करतात आणि आई घर चालवण्यासाठी शिवणकाम करते. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाला महत्त्व दिले. शिवांशची मोठी बहीण वकील आहे. अतिशय साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या शिवांशने आपल्या कठोर परिश्रमाच्या बळावर हे शिखर गाठले आहे.

आपल्या या अभूतपूर्व यशाबद्दल बोलताना शिवांश अत्यंत नम्रपणे म्हणतो, “माझ्या मनात लहानपणापासूनच काहीतरी चांगले करण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे मी पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले.” त्याने आपले शालेय शिक्षण डीएसके स्कूलमधून पूर्ण केले आणि त्यानंतर एसपीआय औरंगाबादमधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. सुरुवातीला त्याने ‘एनडीए’ परीक्षेची तयारी केली, परंतु त्यात त्याला यश मिळाले नाही.

शिवांश पुढे सांगतो, “मला नेहमीच समाजसेवेची आवड होती. त्यामुळे अशी नोकरी करायची होती, ज्यातून मी समाजाला न्याय देऊ शकेन आणि त्यांचे हक्क त्यांना मिळवून देऊ शकेन. याच विचारातून मला स्पर्धा परीक्षेचा मार्ग योग्य वाटला.” घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याने कोणत्याही क्लासशिवाय स्वतःच अभ्यास करण्याचा निर्धार केला आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तयारी केली.

“पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल याची मला खात्री होती, कारण मी तयारी करताना खूप मेहनत घेतली होती,” असे तो आत्मविश्वासाने सांगतो.

शिवांशच्या या यशाने हे सिद्ध केले आहे की, जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर यश निश्चित मिळते. आपल्या यशाचा अनुभव सांगताना तो इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांना महत्त्वाचा संदेश देतो, “नियोजनबद्ध तयारी करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल!”
यूपीएससी परीक्षेत देशात २६ वा क्रमांक मिळवणारा पानशेतचा हा ‘शेतकरी पुत्र’ आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. त्याचे हे यश केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे