Avinash Sable Journey from Village to Olympics: जेव्हा मेहनत, जिद्द आणि स्वप्न एकत्र येतात, तेव्हा इतिहास घडतो! २७ ते ३१ मे २०२५ रोजी दक्षिण कोरियात झालेल्या २६व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला २४ पदके मिळाली त्यात ८ सुवर्णपदक, १० रौप्यपदक, ६ कांस्य पदक मिळाले. भारताने पदकांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्रत्येक खेळाडूने आपल्या कष्टाने आणि चिकाटीने देशाचं नाव उंचावलं. याच यशस्वी खेळाडूंपैकी एक नाव आहे ज्याने खेड्यातील मातीच्या रस्त्यांवरून धावताना स्वप्न पाहिलं आणि ऑलिम्पिकच्या मैदानापर्यंत मजल मारली आणि ते नाव आहे अविनाश साबळे!
अविनाश साबळे याचा जन्म १३ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात झाला. त्यांचं कुटुंब हे महार दलित समाजातील शेतकरी कुटुंब आहे. गावात वाहतूक सुविधा नसल्याने अविनाश हा वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शाळेत जाण्यासाठी रोज ६ किलोमीटर पायपीट करत किंवा धावत जाईचा. घरची परिस्थिती देखील हलाखीची होती, पण मात्र अविनाशच्या मनात काही तरी मोठं करून दाखवण्याची जिद्द होती. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करताना त्यांनी वीटभट्टी आणि बांधकाम साईटवर मजुरी करून कुटुंबाला हातभार लावला. या सगळ्या संघर्षातही त्यांचं ध्येय मोठं होतं.
बारावी नंतरचा प्रवास आणि धावण्याची सुरुवात;
बारावी नंतर अविनाश यांनी भारतीय लष्करात महार रेजिमेंटमध्ये प्रवेश केला. सियाचेन ग्लेशियर (२०१३-१४), राजस्थानच्या वाळवंटी भागात आणि नंतर सिक्कीम येथे त्यांची नेमणूक झाली होती. पण,अविनाश याची धावण्याची सुरुवात मात्र लष्करात असताना २०१५ मध्ये झाली होती. सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी आंतर-लष्करी क्रॉस कंट्री धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि याच काळात प्रशिक्षक अमरिश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्टीपलचेस म्हणजे (३००० मीटर हर्डल रेस ) या खेळाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्या काळात अविनाशचं वजन देखील जास्त होतं, पण अविश्वसनीय मेहनतीने त्याने अवघ्या तीन महिन्यांत २० किलो वजन कमी केले. नंतर तो नॅशनल कॅम्पला सामील झाला, जिथे प्रशिक्षक निकोलाई स्नेसारेव यांनी अविनाशच मार्गदर्शन केले. पण त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीशी जुळवून घेणं हे अविनाशला जमत नव्हते, म्हणून २०१८ मध्ये तो पुन्हा आपल्या अमरिश कुमार यांच्याकडे परत आला.
करिअरची सुरुवात आणि राष्ट्रीय विक्रम;
२०१८ मध्ये घोट्याच्या दुखापतीमुळे अविनाश आशियाई गेम्स स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. पण त्यांनी खचून न जाता भुवनेश्वर येथील नॅशनल ओपन चॅम्पियनशिप ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:२९.८० वेळ नोंदवत गोपाल सैनी यांचा ३८ वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडला. ही त्याच्या करिअरची सर्वात मोठी झेप ठरली.
मग मार्च २०१९ मध्ये पाटियाला येथील फेडरेशन कपमध्ये त्याने ८:२८.९४ अशी नवीन वेळ नोंदवली आणि २०१९ आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला. खरतर १९९१ नंतर वर्ल्ड गेम्ससाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय पुरुष स्टीपलचेसपटू ठरला.
आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि यश;
दोहा येथील २०१९ आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अविनाश याने ८:३०.१९ वेळेसह रौप्यपदक पटकावलं. खरतर ही त्याची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती! त्याच वर्षी वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या प्राथमिक फेरीत त्याला अडथळ्यांचा सामना करावा लागला. इथियोपियाच्या एका खेळाडूच्या चुकांमुळे त्याला दोनदा अडखळावं लागलं, तरीही अविनाशने ८:२५.२३ वेळ नोंदवली. इंडियन अॅथलेटिक्स फेडरेशनच्या यशस्वी अपीलनंतर त्याला अंतिम फेरीत स्थान मिळालं. अंतिम फेरीत त्याने ८:२१.३७ वेळ नोंदवत पुन्हा राष्ट्रीय विक्रम केला आणि २०२० ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले.
ऑलिम्पिक्स आणि ऐतिहासिक कामगिरी;
२०२० दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये अविनाश यांनी ६१ मिनिटांपेक्षा कमी वेळेत शर्यत पूर्ण करत नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवला. २०२० टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी ८:१८.१२ वेळ नोंदवत पुन्हा राष्ट्रीय विक्रम केला, पण त्याला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. २०२२ मध्ये त्याने इंडियन ग्रांप्री ८:१६.२१आणि रबात येथील डायमंड लीग ८:१२.४८ मध्ये नवे राष्ट्रीय विक्रम केले. रबात येथे त्याला पाचवं स्थान मिळालं, जे अविनाशच आतापर्यंतचं सर्वोच्च डायमंड लीग स्थान आहे.
२०२४ पॅरिस ऑलिम्पिक्स;
२०२३ डायमंड लीगच्या सिलेसियन शर्यतीत ८:११.६३ वेळ नोंदवत अविनाश याने २०२४ पॅरिस ऑलिम्पिक्ससाठी पात्रता मिळवली. पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये त्याने पहिल्या फेरीत ८:१५.४३ वेळेसह पाचवं स्थान मिळवलं आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. भारतासाठी स्टीपलचेसमध्ये अंतिम फेरी गाठणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. अंतिम फेरीत पहिल्या लॅपमध्ये त्याने आघाडी घेतली, पण नंतर मागे पडला आणि ८:१४.१८ वेळेसह ११व्या स्थानावर राहिला.
पदक थोडक्यात हुकलं, पण त्यांच्या या कामगिरीने भारताचं नावं जगभर गाजलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी; जुई काळे











































