Hotel Bhagyashree Owner Kidnapping Case: नाद करती काय, यावचं लागतंय या टॅगलाइनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेलं …तुळजापूरजवळील भाग्यश्री हॉटेल पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा बनलय, मात्र यावेळी ते चर्चेत आलय ते एका धक्कादायक घटनेमुळे. हॉटेलचे मालक नागेश मडके यांचे बुधवारी (२३ जुलै २०२५) संध्याकाळी अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. अपहरणकर्त्यांनी त्यांना सिद्धेश्वर-वडगाव पुलाजवळ गाडीतून ढकलून ‘हात तोडून, जिवंत मारून जामखेड पुलात टाकू’ अशी गंभीर धमकी दिल्याचा दावा मडके यांनी केला आहे. या घटनेने धाराशिव शहरात खळबळ माजली असून, नागेश मडके आणि त्यांच्या पत्नी लैला थोरात-मडके यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
नेमकी घटना काय:
बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेत अपहरणकर्त्यांनी सुनियोजितपणे कट रचला. माहितीनुसार, काही व्यक्तींनी प्रथम हॉटेल भाग्यश्रीमध्ये जेवण केले. त्यानंतर त्यांनी फोटो काढण्याच्या बहाण्याने नागेश मडके यांना गाडीजवळ बोलावले. मडके गाडीकडे गेले असता, फोटोसाठी डोके आत घालताच गाडीचा दरवाजा बंद करून त्यांना आत खेचण्यात आले. गाडी चालू करून अपहरणकर्त्यांनी मडके यांना मारहाण केली आणि सिद्धेश्वर-वडगाव पुलाजवळ त्यांना गाडीतून खाली ढकलले. यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मडके यांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी त्यांना धमकावताना अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला.
पार्श्वभूमी आणि पूर्वीच्या घटना:
हॉटेल भाग्यश्री गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. सुरुवातीला हॉटेलमधील पदार्थ आणि मालकाने केलेल्या अनोख्या जाहिरातींमुळे ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर हॉटेल बंद असताना बॅनरची तोडफोड, हॉटेलमध्ये हाणामारी आणि धमकीचे फोन यांसारख्या घटनांनी हॉटेलची चर्चा कायम ठेवली. यापूर्वी १० जुलै २०२५ रोजी नागेश मडके यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी फोनवरून मिळाली होती, ज्याची तक्रार धाराशिव पोलिसांत नोंदवण्यात आली होती. पंधरा दिवसांतच अपहरण आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.
मडके दाम्पत्याची मागणी:
नागेश मडके यांनी सांगितले की, त्यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने हॉटेल भाग्यश्री उभारले आहे. मात्र, काही व्यक्ती जाणीवपूर्वक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. लैला थोरात-मडके यांनी पोलिसांना तातडीने कडक कारवाई करून हल्लेखोरांना शोधून काढण्याची मागणी केली आहे. तसेच, यापुढे अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवावा, अशीही मागणी मडके दाम्पत्याने केली आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची विनंती केली आहे.
पोलिसांचा तपास:
धाराशिव पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे. अपहरण आणि मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांना या प्रकरणात तातडीने कारवाई करावी लागणार आहे. यापूर्वीच्या धमकीच्या तक्रारीनंतरही हल्लेखोरांचा शोध लागला नसल्याने पोलिसांवर आता दबाव वाढला आहे.
प्रतिक्रिया आणि परिणाम:
या घटनेमुळे धाराशिवमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हॉटेल भाग्यश्रीच्या यशस्वी कारभारामुळे आणि त्याच्या अनोख्या जाहिरातींमुळे परिसरात प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलला वारंवार अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गातूनही या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांना पकडून कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकावरील हल्ल्याने धाराशिवमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने करतात आणि हल्लेखोरांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात एक शंकेची पाल चुकचुकतीय
खरच हे प्रकरण जस समोर आलय तसंच आहे की हा सगळा खेळ पब्लिसिटी स्टंटचा आहे? एवढ्या भर दिवसा अपहरण कस होऊ शकत ? तेही एका गर्दीच्या ठिकाणाहून? अपहरण होताना कोणीच पाहील नाही का? अपहरण केल तर मग सोडलं कस? हे सगळे प्रश्न आता चर्चेचा मुद्दा बनलेत. खरंच प्रशासन ढेपाळय की कहाणी काही ओर च आहे आता तपासातच समोर येईल….
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रज्ञा शिंदे











































