केंद्र आणि राज्य सरकार नक्षलवाद संपल्याचा दावा करत असतानाच, जनसुरक्षा विधेयक कशासाठी आणले जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सरकारने आणलेले हे विधेयक घटनाबाह्य असून, ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या निदर्शनावेळी त्या बोलत होत्या.
या आंदोलनात खासदार सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “जर नक्षलवाद संपलाच असेल तर सध्या अस्तित्वात असलेले कायदे पुरेसे आहेत. मग सरकार जनसुरक्षा विधेयक आणून ते नक्षलवाद संपवण्यासाठी असल्याचे का जाहीर करत आहे? हे विधेयक आणून सरकार घटनाबाह्य काम करत आहे. या विधेयकाचा मसुदा तयार करताना आम्ही सुचवलेल्या दुरुस्त्यांचा विचार केला गेला नाही,” असेही त्या म्हणाल्या.
या विधेयकाला राष्ट्रवादीसह इतर राजकीय पक्षांनीही विरोध केला होता. अनेक अभ्यासक आणि तज्ञही या विधेयकाला घटनेच्या विरोधात असल्याचे सांगतात. त्यामुळे हे विधेयक मागे घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. “हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसारच चालणार हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे,” असेही सुळे यांनी ठणकावून सांगितले. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या जनसुरक्षा विधेयकावरून आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे










































