दिवाळी म्हंटलं की फराळ आलाच! पण धावपळीच्या जीवनात आणि नोकरी-व्यवसायाच्या व्यापामुळे घरगुती फराळ बनवायला वेळ मिळत नसल्याने, पिंपरी-चिंचवडमधील महिला बचत गट आणि गृहिणींनी तयार केलेल्या दर्जेदार फराळाला तुफान मागणी येत आहे. विशेष म्हणजे, साजूक तुपात बनवलेले आणि चवीला उत्कृष्ट असलेले हे पदार्थ आता केवळ स्थानिक बाजारातच नव्हे, तर थेट परदेशातूनही ऑर्डर मिळवत आहेत.
छोट्या कुटुंबांची वाढती संख्या आणि महिलांचा नोकरीतील सहभाग यामुळे तयार फराळाची मागणी लक्षणीय वाढली आहे. पिंपरीतील मोरवाडी येथील ‘मुक्ताई महिला बचत गट‘ गेली १२ वर्षे सातत्याने चविष्ट दिवाळी पदार्थ बनवत आहे. रिफाईंड तेल आणि साजूक तुपाचा वापर करून पदार्थांची चव व गुणवत्ता टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले आहे, असे गट अध्यक्षा सपना हिवरकर सांगतात. हा गट दिवाळीव्यतिरिक्त वर्षभर पावभाजी, व्हेज बिर्याणी अशा ऑर्डर्सही घेतो.
गृहोद्योजिका अंजली देशपांडे यांच्या मते, गुणवत्तेवरील विश्वासामुळे त्यांना दरवर्षी एका शाळेची तसेच परदेशातील नातेवाईकांसाठी चकली, चिवडा आणि बेसन लाडूची ऑर्डर कुरिअरद्वारे पाठवण्यासाठी मिळते. पुरेशा चांगल्या ऑडर्समुळे व्यवसायाला प्रेरणा मिळत असल्याचे मत गृहोद्योजिका तनुजा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. भाजणीची चकली आणि बेसनाचे लाडू या पदार्थांना सर्वाधिक मागणी आहे.
दिवाळी पदार्थांचे दर (किलोमध्ये रुपयांत): भाजणीची चकली (६५०), करंजी (६५०), बेसन लाडू (६००), रवा लाडू (५५०), बुंदी लाडू (४५०) आणि अनारसे पीठ (३००).
घरगुती व्यवसायातून प्रत्येक गृहिणीने आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करावा, हा संदेश या यशस्वी महिला उद्योजिकांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवडचा हा घरगुती फराळ केवळ दिवाळीची गोडी वाढवत नाही, तर महिलांच्या सबलीकरणाची एक प्रेरणादायक गोष्ट बनला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































