पांढरपेशी दहशतवाद

एन्ट्रोःगेल्या पाच वर्षांपूर्वीच काश्मीरमध्ये उच्चशिक्षित लोक दहशतवादाकडे वळत असल्याचे निष्पन्न झाले होते; परंतु त्या वेळी लष्करी अधिकाऱ्यांनी उच्चशिक्षित पांढरपेशींना दहशतवादाकडे वळू देणार नाही, असे सांगितले होते. आता श्रीनगरपासून अहमदाबादपर्यंत अटक केलेल्या दहशतवाद्यांची पार्श्वभूमी तपासली, तर त्यात उच्चशिक्षितांचा समावेश आहे. उच्चशिक्षितांनी दहशतवादी होणे हा मोठा धोका असून, त्याचा वेळीच गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
गेल्या एका तपापासून दहशतवादी विचारांकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी उच्चशिक्षितांनी संघटितपणे दहशतवाद केला नव्हता. दिल्लीच्या बाँबस्फोटामुळे डॉक्टरांची टोळी दहशतवादात सहभागी होते, यावरून त्यांना दिलेले शिक्षण आणि त्यांची कृती यात मोठे अंतर पडले आहे, हे दिसते. डॉक्टर मानवी जीव वाचवण्यासाठी असतात. त्यांना डॉक्टर होण्यासाठी समाज आणि शासन मोठा खर्च करीत असते. समाजाप्रती उत्तरदायी राहण्याऐवजी धार्मिकतेने अंध झालेले हे उच्चशिक्षित डॉक्टर जेव्हा देशद्रोही होतात, तेव्हा ते त्यांच्या पेशालाही काळिमा फासतात. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी आता अल्पशिक्षित आणि गरिबांऐवजी आता डॉक्टर, वकील, अभियंत्यांचा दहशतवादी कृत्यात समावेश करण्यास सुरुवात केली आहे.

गरीब, अल्पशिक्षितांच्या दहशतवादापेक्षा उच्चशिक्षितांचा दहशतवाद जास्त धोकादायक असतो. त्याचे कारण ते त्यांच्या बुद्धीचा वापर करून घातक शस्त्रास्त्रे बनवू शकतात. अहमदाबादमध्ये अटक केलेल्या एका उच्चशिक्षित दहशतवाद्याने जैविक अस्त्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तो यशस्वी झाला असता, तर हजारो नागरिकांचे जीवित त्यामुळे धोक्यात आले असते. नवी दिल्लीच्या बाँबस्फोटानंतर पांढरपेशांचा दहशतवादातील संबंध उघडकीस आला असला, तरी काही वर्षांपूर्वी जयपूर, कल्याण, पनवेल इथून उच्चशिक्षित लोकच ‘इसिस’मुळे प्रभावित होऊन दहशतवादाकडे वळाले होते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्याकडून मोठे दहशतवादी कट रचले गेले नाहीत; परंतु आता अटक केलेल्या डॉक्टरांच्या कटाचा गुप्तचर संस्थांनी वेळीच पर्दाफाश केला नसता, तर हजारो नागरिकांचे बळी घेण्याची त्यांची योजना तडीस गेली असती. फरिदाबादमधील यात्रेत ४० हजार नागरिकांचा बळी घेण्याचा त्यांचा कट सुदैवाने उघडकीस आला. जगात यापूर्वी झाला नाही, एवढा नरसंहार घडवण्याचा पांढरपेशी दहशतवाद्यांचा कट होता. दिल्ली बॉम्बस्फोटात ‘जैश-ए-मोहम्मद’ (जेईएम) चा हात आहे, हे आता उघड झाले आहे. स्फोट घडवून आणणारा डॉक्टर ‘जैश-ए-मोहम्मद’ मॉड्युल’चा सदस्य होता.

एका काश्मिरी मौलानाला ‘व्हाइट कॉलर’ दहशतवादी मॉड्युल चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या मौलवीने वैद्यकीय विद्यार्थी आणि तरुण डॉक्टरांना लक्ष्य केले होते. दक्षिण काश्मीरमधील शोपियान येथील मौलवी इरफान अहमद वागे याला इमाम इरफान म्हणूनही ओळखले जाते. तो श्रीनगरमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) पॅरामेडिक म्हणून काम करत होता. त्याने आपली नोकरी आणि प्रार्थना वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रभावित करण्यासाठी, तरुणांना कट्टरतावादाकडे ढकलण्यासाठी वापरली. मौलवी हा ‘जैश मॉड्युल’चा मुख्य चेहरा आहे. त्याने वैद्यकीय व्यावसायिकांची भरती, निधी संकलन, ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ आणि ‘आयईडी’साठी साहित्याची व्यवस्था केली. त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
काश्मीरमधील अनंतनाग मेडिकल कॉलेजमधील एका डॉक्टरच्या लॉकरमध्ये एके-४७ सापडल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जम्मूमधील सर्व डॉक्टरांच्या लॉकरच्या चाव्या परत घेतल्या जात आहेत. यानंतर, एक समिती या सर्व लॉकरची तपासणी करेल आणि कोणत्याही लॉकरमध्ये कोणतीही आक्षेपार्ह सामग्री नाही याची खात्री करेल. ही समिती ‘जीएमसी’च्या प्राचार्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम करेल. गेल्या आठवड्यात देशभरात झालेल्या अटकेमुळे एका पांढरपेशी दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये चार डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आता दहशतवादाची मुळे सामान्य व्यावसायिक वर्गापर्यंत पोहोचली आहेत. आश्चर्याची गोष्ट सुशिक्षित आणि समाजात आदरणीय असलेल्या व्यक्ती दहशतवादासाठी काम करीत आहेत.

दहशतवाद्यांकडे २,९०० किलोपेक्षा जास्त स्फोटके, आरडीएक्स, अमोनिया, रायफल आणि पिस्तूल सापडले. गुजरातमध्ये तर विष आणि शस्त्रे बनवण्यासाठी वापरली जाणारे रसायने सापडली होती. काश्मीर आणि गुजरातमधील अटक एकाच दिवशी झाली आणि दुसऱ्या दिवशी दिल्लीत बाँबस्फोट झाला. सुरक्षा एजन्सींनी अद्याप दोन्ही नेटवर्क एकमेकांशी जोडलेले आहेत, की नाही हे उघड केलेले नाही. तपासात असे दिसून आले आहे, की हे डॉक्टर पाकिस्तान आणि इतर देशांतील दहशतवाद्यांच्या म्होरक्यांशी संपर्कात होते. ते ‘इसिस’, ‘जैश-ए-मोहम्मद’ (जेईएम) आणि ‘अन्सार गजवत-उल-हिंद’ (एजीयूएच) सारख्या संघटनांशी संपर्कात होते. यावरून त्यांचे नेटवर्क किती मोठे होते, हे समजते. अहमदाबादमध्ये अटक केलेली व्यक्ती देशाच्या विविध भागात रासायनिक आणि शस्त्रे हल्ले करण्याची तयारी करत होते. अनंतनाग मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर डॉ. आदिल अहमद राथेर ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘अन्सार गजवत-उल-हिंद’शी संपर्कात होता. अल-फलाह विद्यापीठात शिकवणारा काश्मिरी डॉक्टर डॉ. मुझमिल शकील याला फरिदाबाद येथे अटक करण्यात आली. बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात येणारे ३६० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले.

मुझमिलच्या दुसऱ्या लपण्याच्या ठिकाणाहून २५६३ किलो स्फोटके जप्त करण्यात आली. त्याचे ‘जैश’ शी संबंध आहेत आणि तो पूर्वी श्रीनगरमध्ये दहशतवादी पोस्टर लावण्यात सहभागी होता. अल-फलाह विद्यापीठातील एका महिला डॉक्टरलाही अटक करण्यात आली. तिच्या कारमधून ‘कॅरम कॉक’ नावाची असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अहमद मोहिउद्दीन सय्यद नावाच्या डॉक्टरला अटक केली. तो मूळचा हैदराबादचा आहे. त्याने चीनमध्ये शिक्षण घेतले आहे. तपासात असे दिसून आले, की तो एरंडेलच्या बियांपासून बनवलेले रिसिन नावाचे अत्यंत विषारी विष तयार करत होता. एक थेंब तेलातून हजारो लोकांना कसे मारता येईल, याचा शोध तो घेत होता. त्याने दिल्लीची आझादपूर मंडी, अहमदाबादची नरोडा फळ बाजार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लखनऊमधील कार्यालय यासारख्या गर्दीच्या ठिकाणी अनेक महिने शोध घेतला होता. तो ‘इसिस-खोरासान’ प्रांतातील दहशतवादी अबू खादिमच्या संपर्कात होता. त्याच्याविरुद्ध ‘यूएपीए’, शस्त्रास्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चार डॉक्टरांच्या अटकेवरून असे दिसून येते, की दहशतवाद आता जंगलांपुरता किंवा सीमांपुरता मर्यादित नाही. हे आता देशातील उच्चभ्रू सुशिक्षित वर्गातही रुजत आहे. अधिकारी त्याला ‘व्हाईट कॉलर टेरर नेटवर्क’ म्हणत आहेत, म्हणजे बंदुकांनी नव्हे, तर मनाने दहशत घडवण्यात आली. हे सर्व डॉक्टर केवळ दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नव्हते, तर शस्त्रे आणि विषारी रसायनेदेखील बनवत होते. यावरून स्पष्ट होते, की दहशतवादाचा चेहरा बदलत आहे. तो आता फक्त बंदुकधारी लोकांचा नाही, तर प्रयोगशाळांमध्ये असलेल्या लोकांचा आहे.

देशात दहशतवादाचा चेहरा बदलत आहे. हे अशिक्षित लोक नाहीत, तर रुग्णालयातील पांढऱ्या कोटातील डॉक्टर आहेत, जे जीव वाचवण्याची शपथ घेतल्यानंतर मृत्यूचे तांडव करण्याचा कट रचत होते. फरिदाबादमध्ये अटक करण्यात आलेली डॉ. शाहिन शाहिद ही भारतातील ‘जैश’ या दहशतवादी संघटनेसाठी महिला शाखा तयार करण्यासाठी प्रयत्न करीत होती. पाकिस्तानात ‘जैश’च्या महिला विंगची जबाबदारी ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर याची बहीण सादिया अजहरकडे आहे. ‘जमात-उल-मोमिनत’ ही ‘जैश’ची महिला शाखा आहे. तिची भारतातील म्होरकी डॉ. शाहिन शाहिद होती. सादियाचा पती युसूफ अजहर हा कंधार विमन अपहरणाचा सूत्रधार होता. डॉ. आदिल (कुलगाम) ला सहारनपूरमध्ये अटक करण्यात आली. तो उत्तर प्रदेशात स्थलांतरित झाला होता. त्याच्याकडे ‘जैश-ए-मोहम्मद’चे पोस्टर्स सापडले. त्याचे शस्त्रास्त्रांचे कनेक्शन असल्याचे आढळून आले. या व्यक्ती पाकिस्तान आणि इतर देशांमधील हँडलर्सच्या संपर्कात होते आणि ‘सामाजिक कार्य’ च्या नावाखाली निधी गोळा करत होते. या अटकांवरून असे दिसून येते, की दहशतवाद आता झोपडपट्ट्या किंवा सीमांपुरता मर्यादित नाही. सुशिक्षित मुस्लिम तरुण, विशेषतः डॉक्टर आणि अभियंते, कट्टरपंथी प्रचाराचे बळी पडत आहेत आणि ‘सोशल मीडिया’ आणि ‘एन्क्रिप्टेड ॲप’द्वारे त्यांचे ब्रेनवॉश केले जात आहे. याचा अर्थ असा, की हे सर्व डॉक्टर केवळ दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नव्हते, तर ते स्वतः शस्त्रे आणि विषारी रसायनेदेखील तयार करत होते. यावरून स्पष्ट होते, की दहशतवादाचा चेहरा बदलत आहे.

भागा वरखडे