अधूनमधून काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचा प्रश्न डोके वर काढीत असतो. कर्नाटकात काँग्रेसला यश मिळवून देण्यात प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा मोठा वाटा असला, तरी सिद्धरामय्या यांच्या समर्थकांची संख्या जास्त असल्याने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर आली. त्या वेळी अडीच वर्षांनंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव होता असे सांगितले जाते; परंतु सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नसल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे.
काँग्रेसच्या ताब्यात असलेले कर्नाटक हे आता एकमेव मोठे राज्य आहे. तिथे काँग्रेसला सत्ता आणता येते; परंतु ती टिकवता येत नाही, हा अनुभव आहे. आताही कर्नाटकात काँग्रेसमधील संघर्ष सुरूच आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात तणाव आहे. शिवकुमार यांच्या समर्थकांनी उघड नेतृत्व बदलाची मागणी केली नसली, तरी त्यासाठी दिल्ली दरबारी तळ ठोकला आहे. हे समजताच सिद्धरामय्या यांनी १४० आमदारांसह दिल्ली गाठली. काँग्रेसने नेतृत्व बदल केला, तर आपल्यामागे एवढे समर्थक असून काहीही होऊ शकते, हे दाखवण्याचा आणि तसा अप्रत्यक्ष इशारा देण्याचा त्यांचा हेतू होता. सिद्धरामय्या यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. कर्नाटक हे खर्गे यांचे राज्य असून, राष्ट्रीय अध्यक्षांच्या राज्यातला हा सत्ता संघर्ष परवडणारा नाही. एकीकडे शिवकुमार यांनी नेतृत्व बदलाची चर्चा फेटाळून लावली आहे, दुसरीकडे सिद्धरामय्या यांनी पक्षनेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य राहील, असे सांगितले आहे. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. खर्गे यांच्याशी भेट घेतल्यानंतर, सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या अटकळांना फेटाळून लावले. सिद्धरामय्या यांनी खर्गे यांच्याशी झालेल्या भेटीचे वर्णन सौजन्य भेट म्हणून केले. नवी दिल्लीहून बेंगळुरूमध्ये परतल्यानंतर त्यांनी कर्नाटकातील नेतृत्व बदलाबाबत सांगितले, की पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेईल तो मी स्वीकारेन. पक्षश्रेष्ठी कधी निर्णय घेईल असे विचारले असता सिद्धरामय्या म्हणाले, की लवकरच. मुख्यमंत्रिपदावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी दावा केला, की ते भविष्यात त्यांच्या पदावर राहतील आणि राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. प्रत्युत्तरात शिवकुमार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. खर्गे यांची भेट घेतल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले, की ही एक सौजन्यपूर्ण भेट होती. तथापि, बैठकीदरम्यान, आम्ही संघटना आणि बेंगळुरू महानगरपालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलदेखील चर्चा केली. राज्यात मुख्यमंत्री बदलण्याबाबत काही चर्चा सुरू आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, की ही फक्त अटकळ आहे. कर्नाटकचे आमदार खर्गे यांना का भेटले, असे विचारता त्यांनी तिरकस उत्तर दिले. विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्य शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यावर शिवकुमार, सिद्धरामय्या आणि खर्गे काहीच बोलत नाहीत.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. त्याअगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. एकीकडे ही स्थिती असताना कर्नाटकातील काँग्रेसमधील सुंदोपसुंदीचा फायदा उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दक्षिण दिग्विजयाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे राज्य भाजपला पुन्हा जिंकता आले नाही. मागच्या सारखे काँगेसच्या आमदारांना गळाला लावून सत्ता बदल करता येतो का, हे भाजप अजमावत आहे; परंतु माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा हे अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी चौकशीला सामोरे जात आहे. त्यांच्या मुलाकडे त्यांच्यासारखे कर्तृत्व नाही. धर्मनिरपेक्ष जनता दल केंद्रातील सत्तेत असले, तरी लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे कुटुंब अगोदरच बदनाम झाले आहे. अशा स्थितीत काँग्रेसमधील सत्ता संघर्षाचा फायदा उठवण्याची त्यांची कुणाची क्षमता आहे का, हा खरा प्रश्न आहे. सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूमध्ये खरगे यांची पुन्हा भेट घेतली. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि आता पक्षश्रेष्ठी जे सांगतील त्याचे पालन करतील, असे सांगितले. खर्गे यांनी सिद्धरामय्या यांना दिल्लीला आमंत्रित केले आहे. या बैठकीत कर्नाटकातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा होईल. सिद्धरामय्या नोव्हेंबरच्या अखेरीस दिल्लीला जाऊ शकतात असे वृत्त आहे. दोन्ही नेते जरी पक्षात कोणताही संघर्ष नसल्याचे आणि नेतृत्वावरून वाद नसल्याचे सांगितले असले, तरी गुप्तचर अहवालांनी पक्ष नेतृत्वाला इशारा दिला आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय गतिरोधामुळे सरकारची प्रतिमा खराब होत आहे आणि त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. सिद्धरामय्या यांनी खर्गे यांच्यांशी झालेल्या भेटीत राजकीय गोंधळाचा आणि त्याचा प्रशासनावर होणाऱ्या परिणामांबाबत सविस्तर चर्चा केली. खर्गे यांच्यांशी त्यांनी पक्ष संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्हा/तालुका पंचायत निवडणुकांवर चर्चा केली. मंत्रिमंडळ बदल किंवा नेतृत्व बदलावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले. पक्षातील आमदारांमधील असंतोषाबद्दल त्यांनी खर्गे यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी सांगितले, की आमदारांनी दिल्लीला जाणे सुरू ठेवावे; परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी जे काही म्हणतील, ते सर्वांना स्वीकारावे लागेल. हा शिवकुमार यांना टोला होता. सिद्धरामय्या यांच्या पत्रकार परिषदेमुळे राज्य काँग्रेसमधील गोंधळ आणखी वाढला आहे. महिन्याच्या अखेरीस दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होऊ शकते असे संकेत आहेत.
कर्नाटकात सरकार स्थापनेच्या वेळी अनौपचारिक नेतृत्व बदल सूत्रावर सहमती झाली होती, ज्या अंतर्गत अर्ध-कार्यकाळानंतर सत्ताबदल विचारात घेतला जाईल असे मानले जाते. तथापि, अद्याप असे झालेले नाही. शिवकुमार यांनी अलीकडेच ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म एक्वर ‘नोव्हेंबर क्रांती’ आणि आमदारांसाठी दिल्ली निवडणुकांबद्दल एक संदेश पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिले आहे, की सर्व १४० आमदार त्यांचे स्वतःचे आहेत. गट तयार करणे त्यांच्या स्वभावात नाही. मुख्यमंत्री आणि मी नेहमीच पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे पालन करतो असे म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरीनंतर कर्नाटकात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा राजकीय लढाई सुरू झाली आहे. कर्नाटकातील सत्तेची सूत्रे दिल्ली दरबारातून हलवली जात आहेत. २०२३ च्या कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस जिंकल्यानंतर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. शिवकुमार यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या सत्तावाटपाच्या सूत्रावर अवलंबून राहून पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. शिवकुमार यांना पाठिंबा देणारे आमदार मुख्यमंत्री बदलण्याची मागणी करत दिल्लीत पोहोचले. मुख्यमंत्रिपदात कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुढचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे सांगितले. कर्नाटकच्या मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला. त्याच दिवशी शिवकुमार यांचे जवळचे मानले जाणारे तीन आमदार आणि एक मंत्री दिल्लीत गेले. शिवकुमार समर्थकांनी खर्गे यांची भेट घेतली. या बैठकीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत अटकळ निर्माण झाली आहे. कर्नाटकात कोणतीही क्रांती नाही, कोणताही भ्रम नाही. आमच्याकडे पाच वर्षांचा जनादेश आहे आणि आम्ही तो पूर्ण करू. अशाप्रकारे, त्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा दावा केला आहे. सिद्धरामय्या कर्नाटकात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम प्रस्थापित करू इच्छितात; परंतु शिवकुमार राजकीय अडथळा बनत आहेत. जर सिद्धरामय्या जानेवारी २०२६ पर्यंत मुख्यमंत्री राहिले, तर ते कर्नाटकात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदाचा देवराज उर्स यांचा विक्रम मोडतील, म्हणूनच सिद्धरामय्या पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहण्याबाबत बोलत असताना, शिवकुमार परिस्थितीची निकड समजून स्वतःचे पाऊल उचलत आहेत. सिद्धरामय्या पद सोडण्यास तयार नाहीत, तर शिवकुमार यांनी निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर सोपवला आहे. शिवकुमार मात्र त्यांना मुख्यमंत्रिपद कधी मिळते, याकडे नजर लावून बसले आहेत. ते पक्षाच्या किंवा गांधी कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेऊ इच्छित नाहीत आणि पक्षश्रेष्ठींकडे मत मांडावे असा सावधगिरीने आग्रह धरत आहेत. काँग्रेस पक्षाचे बदलते राजकारण आणि ओबीसी राजकारणावर त्यांचे लक्ष केंद्रित पाहता, सिद्धरामय्या पाच वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा दावा करत आहेत. ओबीसी मतपेढीमुळे त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकणे कठीण आहे, हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना माहिती आहे. काँग्रेसने अलीकडेच सिद्धरामय्या यांची पक्षाच्या ओबीसी सल्लागार परिषदेत नियुक्ती केली आहे. शिवाय, कर्नाटकातील ओबीसी समुदायावर त्यांची मजबूत पकड आहे आणि लोकप्रियतेत ते इतर अनेक पक्ष नेत्यांना मागे टाकतात. शिवकुमार हे वोक्कालिगा समुदायाचे एक प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी जुन्या म्हैसूर प्रदेशात काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वोक्कालिगा समुदाय भाजपकडे झुकला आहे. यामुळेच सिद्धरामय्या आपले स्थान सुरक्षित मानतात, तर शिवकुमार काँग्रेस नेतृत्वाच्या मौनाबद्दल अस्वस्थ आहेत. शिवकुमार यांचा स्वतःचा राजकीय प्रभाव आहे आणि ते एक मजबूत संघटनात्मक नेते आहेत. त्यांना काँग्रेसचे संकट सोडवणारे मानले जाते. सिद्धरामय्या यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर, शिवकुमार यांनी एका वेगळ्या पक्षाच्या कार्यक्रमात म्हटले आहे, की मी हे पद (पक्षाध्यक्ष) कायमचे सांभाळू शकत नाही. साडेपाच वर्षे झाली आहेत. मला पदभार स्वीकारून सहा वर्षे झाली आहेत आणि मार्चमध्ये सहा वर्षे होतील. त्यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितले, की काळजी करू नका, मी रांगेत पहिला आहे. आता त्यांची पाळी कधी येते, हे येणारा काळच ठरवील.
भागा वरखडे













































