पिंपरी बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. दैनंदिन वापरातील भाज्यांचे दर आवाक्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मटार, वांगी, भेंडी, टोमॅटो आणि फ्लॉवर यांसारख्या फळभाज्या तसेच मेथी, कोथिंबीर, पालक या पालेभाज्यांना चांगली मागणी असून, त्यांचे दर सामान्य झाले आहेत. उदाहरणार्थ, मागील काही दिवसांपासून 200 ते 240 रुपये प्रति किलो असलेला मटार आता थेट 80 रुपयांवर आला आहे, तर 100 रुपये किलोवर गेलेली वांगी आता 60 रुपयांवर स्थिरावली आहे.
भेंडीचे दरही 20 रुपयांवरून 50 रुपये किलोवर आले आहेत. फळभाज्यांची एकूण 4,809 क्विंटल आणि पालेभाज्यांच्या 62,500 गड्यांची आवक झाल्यामुळे ही दरकपात शक्य झाली आहे.
या आनंदाच्या वातावरणात, शेवग्याचे दर मात्र अजूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. शेवग्याचे दर 500 रुपयांवरून थोडे कमी होऊन आता 300 ते 350 रुपये प्रति किलोवर आले आहेत. नाशिकमधून आलेल्या ‘डबल बीन्स’ या भाजीलाही 200 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर 10 रुपये, मेथी 25 ते 30 रुपये आणि पालक 15 ते 20 रुपये प्रति जुडी दराने मिळत आहे, ज्यामुळे मेथी आणि पालकला विशेष मागणी वाढली आहे. फळांचीही 725 क्विंटल आवक झाली असून, सफरचंद 100 ते 120 रुपये, तर केळी 100 रुपये प्रति डझन दराने उपलब्ध आहेत. एकूणच, भाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला असून, शेवग्याचे चढे दर वगळता बाजारात समाधानाचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे












































