केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन श्रम संहितांमुळे देशातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे. २१ नोव्हेंबरपासून या नवीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली असून, आता कर्मचारी राज्य विमा योजनेचा (ईएसआय) लाभ विविध क्षेत्रांतील कामगारांना मिळणार आहे.
या बदलांमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे गिग कामगार (Gig Workers) आणि प्लॅटफॉर्म कामगारांना ईएसआयच्या कक्षेत आणणे. स्वयंरोजगार करत असलेले किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या लाखो कामगारांना यामुळे आता आरोग्य आणि सामाजिक सुरक्षेचे कवच मिळणार आहे.
नवीन कायद्यानुसार ईएसआय योजनेतील ‘कुटुंब’ या संकल्पनेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. आता कामगाराची पत्नी आणि मुलांसोबतच, त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले भाऊ, बहीण, तसेच सासू आणि सासरे यांनाही ईएसआयचा लाभ मिळू शकणार आहे. ही एक ऐतिहासिक सुधारणा मानली जात आहे.
याशिवाय, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघाताची व्याख्या देखील व्यापक करण्यात आली आहे. आता घरातून कामावर जाताना कामगाराचा अपघात झाल्यास, तो अपघात नोकरीदरम्यानचा अपघात समजून कामगाराला विम्याचा लाभ मिळणार आहे.
कामगार कायदा अभ्यासक अॅड. अजित बोराडे यांनी या बदलांचे स्वागत केले आहे. मात्र, आयटक महाराष्ट्र राज्य कौन्सिलचे सदस्य अनिल रोहम यांनी ही केवळ ‘जाहिरातबाजी’ असून, असंघटित क्षेत्रासाठी अद्याप कोणताही शासन निर्णय किंवा अधिकृत परिपत्रक आलेले नसल्याचा दावा केला आहे. ईएसआयसी रुग्णालय, मोहननगरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा सुपे यांनीही याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नवीन कायद्यामुळे कामगारांना सामाजिक आणि आरोग्य सुरक्षा मिळणार, यात शंका नाही, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































