दुबई (संयुक्त अरब अमिराती) : “शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात” या प्रेरणादायी संकल्पनेतून दुबई येथे सलग १२ व्या वर्षी ज्ञानवर्धक शिवजयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच, दुबई आणि सत्यशोधक, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने परदेशातील मराठी समाजात इतिहासाभिमान, बौद्धिक प्रबोधन आणि सामाजिक एकात्मतेची जाणीव अधिक दृढ केली.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून झाली.
जिजाऊ ब्रिगेड दुबईच्या महिला सदस्यांनी सादर केलेल्या जिजाऊ वंदनेने वातावरण प्रेरणादायी झाले. दुबईतील पहिल्या महिला संचलित “स्वामिनी ढोल-ताशा पथकाच्या” जोशपूर्ण वादनाने सभागृह दुमदुमले. मुकुंदराज पाटील आणि विक्रम भोसले यांनी दिलेल्या ‘शिव-शंभू गर्जनेने उपस्थितांमध्ये उत्साह व अभिमानाची भावना निर्माण केली.या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. अशोक राणा (राष्ट्रीय अध्यक्ष – जगद्गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषद, भारत) उपस्थित होते. “शिवचरित्रातून आजच्या युवकांनी काय शिकले पाहिजे” या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी इतिहासातील संदर्भ अत्यंत सोप्या, रसाळ आणि अभ्यासपूर्ण भाषेत उलगडून दाखवले. शिवरायांचा इतिहास केवळ कथन न करता त्यांनी प्रत्येक घटनेमागील सामाजिक, राजकीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोन स्पष्ट केला. शिवचरित्र हे व्यवस्थापनशास्त्र, संघटनकौशल्य, शिस्त, स्त्रीसन्मान, राष्ट्रनिष्ठा आणि दूरदृष्टी यांचे जिवंत विद्यापीठ आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
आजच्या युवकांनी आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि समाजाभिमुख नेतृत्वगुण आत्मसात करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.तसेच डॉ. अशोक राणा यांनी नाग, मिथके आणि भूत-प्रेतांच्या पारंपरिक कहाण्यांचा सांस्कृतिक आणि इतिहासिक संदर्भ सांगितला. त्यामागील प्रतीकात्मक अर्थ आणि लोकजीवनातील महत्त्वही स्पष्ट केले.यामुळे उपस्थितांना परंपरा आणि लोककथांची सखोल समज मिळाली.तसेच मा. महेश चव्हाण (संस्थापक – मराठी पैसा) यांनी “आर्थिक सक्षम कसे होता येईल” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिवरायांची अर्थनीती, संसाधन व्यवस्थापन आणि दूरदृष्टी आजच्या आर्थिक नियोजनात कशी उपयुक्त ठरू शकते, याचे प्रभावी विश्लेषण त्यांनी केले. आर्थिक स्वाक्षरता, नियोजनबद्ध गुंतवणूक, सातत्यपूर्ण शिक्षण आणि दीर्घकालीन ध्येय निश्चिती यांवर भर देत त्यांनी “सातत्य ठेवा, शिकत रहा, संधी आपोआप चालून येते” असा प्रेरणादायी संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून रणनीती, शिस्त आणि आर्थिक दूरदृष्टीचे आदर्श उदाहरण आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.या सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. अशोक राणा लिखित ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’, ‘किल्ल्यांच्या दंतकथा आणि मिथके’, ‘छत्रपती शिवराय’, ‘पौर्वात्य मातृदेवता’ आणि ‘संत साहित्यातील जीवनमूल्ये’ या पाच ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. प्राजक्त प्रकाशन चे प्रमुख जालिंदर चांदगुडे यांच्या पुढाकारातून प्रकाशित झालेल्या या पुस्तकांचे दुबईस्थित शिवप्रेमींच्या हस्ते अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी अभिजीत देशमुख यांनी सत्यशोधकच्या कार्याचा तसेच मागील ११ वर्षांच्या शिवजयंती उपक्रमांचा आढावा सादर केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच आणि सत्यशोधक दुबई यांचा प्रेरणादायी प्रवास उपस्थितांसमोर मांडण्यात आला. त्यानंतर मुकुंदराज पाटील व विक्रम भोसले यांनी मान्यवरांची ओळख करून दिली.या निमित्ताने चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमस्थळी सामाजिक प्रबोधनपर संदेश देणारी भित्तीपत्रके लावण्यात आली होती. दुबईमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने “शिवग्रंथ पेटी आपल्या दारी” हा विशेष उपक्रम राबवण्यात येत असून महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा सपकाळे आणि विजयसिंह शिंदे यांनी प्रभावीपणे केले. ऑनलाईन प्रसारणाची जबाबदारी आशिष जीवने यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. समारोपप्रसंगी दीपक जोगदंड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आशिष जीवने, राजेश पाटील, विक्रम भोसले, अभिजीत देशमुख, विजयसिंह शिंदे, मुकुंदराज पाटील, संतोष सपकाळे, सुनंदा सपकाळे, पंकज आवटे, सुनीता देशमुख, प्रियांका भोसले, शुभांगी पाटील, अमृता शिंदे, निखिल गणूचे, दीपक जोगदंड, जितू सपकाळे, जयंत रंगारी, अरहंत पाथर्डे, रोहन शिंदे, सचिन सपकाळे, अमोल दुबे पाटील, रामेश्वर कोहकडे, अमोल कोचळे, अन्वर खान, काशीनाथ टिपटे, सचिन कदम आणि रघुनाथ बापू सगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवरही दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह, उम अल क्विन आणि रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. विदेशात राहूनही शिवरायांचे विचार, संस्कार आणि परंपरा जपण्याचे कार्य दुबईतील शिवप्रेमी सातत्याने करीत असून, ही ज्ञानवर्धक शिवजयंती केवळ उत्सव न ठरता समाजप्रबोधन आणि बौद्धिक जागृतीचा प्रेरणादायी सोहळा ठरला.













































