लातूर, ८ जुलै २०२० : लातूरमध्ये नुरताच एक अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भोंदूबाबाने दिलेला प्रसाद खाल्ल्याने २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली असून या भोंदूबाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
औसा तालुक्यातील सारोळा गावात हा धक्कादायक प्रकार घडला. देवीची परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी गावातील काही लोक एका आराद्याकडे गेले असता.त्याने योग्य मुहर्त पाहून लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारून गावातील अनेकांना प्रसाद खायला दिला. त्यामुळे अनेकांनी हा प्रसाद खाल्ला. परंतू तत्पुर्वी हा गावातील आरादी एका करोनाबाधिताच्या संपर्कात आला होता. दोन दिवसानंतर आजारी पडलेल्या या आराद्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली . त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता २० जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे २० लोक तीन वेगवेगळ्या कुटुंबातील असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच सारोळा गावात एकच खळबळ उडाली असून गावच्या पोलीस पाटलाने आराद्याविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या आराद्याविरोधात कठोर कारवाईची मागणी आता होत आहे.या घटनेनंतर या २० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.आणि हे २० जण गावातील कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचा ही शोध घेण्यात येत आहे.
या सर्व प्रकारामुळे संपूर्ण सरोळा गाव सध्या दहशतीमध्ये आहे आणि तसेच आता अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
अशा कोरोना साथीच्या आजारा वेळेस ही अशी कर्मकांड करण्याची परवानगी कोणी दिली? गावातील लोकांना या विषाणूबाबत जराही चिंता नसावी का? भोंदूबाबा असे उघड पणे कर्मकांड करत असताना ग्रामस्थांनी त्याला का रोखले नाही? पण सद्यपरिस्थिती पाहता संपूर्ण सारोळा गावात आता कोरोनाचा शिरकाव होईल अशी भिती नागरिंकाकडून व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी