शेअर बाजारात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान

25

मुंबई १७ फेब्रुवारी २०२५ : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी (१७ फेब्रुवारी) बाजार उघडताच सेन्सेक्स ३०० अंकांनी कोसळला आणि काही वेळातच ७५,२९४ अंकांपर्यंत घसरला. सकाळी १०:१० वाजता सेन्सेक्स ५१८ अंकांच्या घसरणीसह ७५,४२१ वर व्यापार करत होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी देखील २२,८०९ अंकांवर उघडला आणि त्यानंतर १४८.२० अंकांनी घसरून २२,७८१ वर पोहोचला.

गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान

या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसईतील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ५,१९,९५३ कोटी रुपयांनी घसरून ३९५.७९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना हे मूल्य ४००.९९ लाख कोटी रुपये होते.

घसरणीमागची कारणे काय?

शेअर बाजारातील ही सातत्यपूर्ण घसरण अनेक कारणांमुळे झाली आहे. गेल्या आठ ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी तब्बल 3.2%ने घसरला आहे. भारतीय कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीतील कमजोर आर्थिक निकाल, बाजारातील उच्च मूल्यांकन आणि जागतिक अनिश्चितता ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, परदेशी गुंतवणूकदार (FIIs) भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढत असल्यानेही बाजारावर दबाव वाढला आहे.

ग्लोबल संकेतही कमजोर

जागतिक बाजारपेठेतही संमिश्र स्थिती आहे. अमेरिकेच्या बाजारात शुक्रवारी डाऊ जोन्स ०.३७% घसरला, S&P ५०० मध्ये ०.०१% घसरण झाली, तर नॅसडॅक ०.४१ % वाढला. आशियाई बाजारांमध्ये जपानचा निक्केई २२५ ०.०७% घसरला, दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.४७% वाढला, तर ऑस्ट्रेलियाचा ASX२०० ०. ६%ने खाली आला.

या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे काय?

या आठवड्यात शेअर बाजारावर परिणाम करणाऱ्या काही महत्त्वाच्या घटनांवर गुंतवणूकदारांची नजर असणार आहे:

१८ फेब्रुवारी: ऑस्ट्रेलियाच्या सेंट्रल बँकेचा (RBA) व्याजदरविषयीचा निर्णय आणि ब्रिटनच्या महागाई दराचे आकडे.

१९ फेब्रुवारी: जपानच्या व्यापार संतुलनाची माहिती.

२० फेब्रुवारी: अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (FOMC) मागील बैठकीचे मिनिट्स जाहीर होणार.

२१ फेब्रुवारी: भारत, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचे फेब्रुवारी महिन्याचे उत्पादन आणि सेवा PMI डेटा.

निवेशकांनी काय करावे?

बाजारातील वाढती अस्थिरता पाहता तज्ज्ञ दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर देण्याचा सल्ला देत आहेत. अल्पकालीन नफ्यासाठी बाजारात खरेदी-विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच, ग्लोबल घडामोडींचे भान ठेवून पुढील निर्णय घ्यावेत.

शेअर बाजारातील सातत्यपूर्ण घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. विदेशी गुंतवणूकदारांची माघार, कंपन्यांचे नकारात्मक निकाल आणि जागतिक अस्थिरता यामुळे बाजार दडपणाखाली आहे. गुंतवणूकदारांनी याठिकाणी संयम बाळगून माहितीपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा