रेल्वेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना करावा लागतोय अडचणीचा सामना

पुरंदर, दि. २७ जून २०२० : पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील नागरिकांना रेल्वेने केलेल्या चुकीच्या कमामुळे अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.रेल्वेच्या अंडरपास पुलाखाली पाणी साचल्याने अनेक गावातील लोकांना चार फूट पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.रेल्वे प्रशसनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे सुकलवडी फाटक होते. संत ज्ञानेश्वर पालखी तळाकडे जाताना सुध्दा हे फाटक पार करून जावे लागते.आषाढीवारी काळात यामुळे मोठी आडचण निर्माण होत होती. त्यामुळे या भागातील लोकांनी रेल्वेकडे ओव्हर ब्रिजची मागणी केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने ओव्हर ब्रीज न करता अंडरपास रस्ता केला. हा रस्ता करत असताना या ठिकाणचे पाणी काढून देण्यासाठी ज्या पद्धतीने उपाययोजना होणे गरजेचे होते, त्यापद्धतीने याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या वर्षी पासून म्हणजेच पूल सुरू झाल्यापासून ज्या वेळेस या भागात पाऊस पडतो त्यावेळेस या अंडरपास पुलामध्ये मध्ये चार फुटापर्यंत पाणी साचते.

त्यामुळे रेल्वे यांच्या पलीकडे असलेली सुकलवाडी, अंबाजीवाडी, मुकदमवाडी, गायकवाडवाडी,राख,कापडदारा, या भागातील लोकांना वाल्हे मध्ये येताना या मोरीत साठलेल्या पाण्यातून प्रवास करून यावे लागतो. या भागातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वाल्हे येथे येत असतात. या विद्यार्थ्यांना सायकल व दुचाकी वाहने घेऊन येताना मोठ्या कष्टाने पाण्यातून अलीकडे यावे लागते. त्यामुळे येथे अपघात होण्याची मोठी शक्यता आहे.

याबाबत रेल्वे प्रशासनाला वारंवार कल्पना देवूनही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसते. काल वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले व काही ग्रामस्थांनी या ठिकाणी जावून पाहणी केली असता मोरीत पाणी ज्या गटारातून काढून दिले आहे त्यामधे अनेक दगड-गोटे पडले आहेत आणि ते बंद झाले आहे. ठेकेदाराने गटारीचे काम करताना ते खोल काढणे आवश्यक होते. मात्र चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे गटार उंचावर आणि पूल खड्ड्यात अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे पाण्याचा पूर्णपणे निचरा होत नाही. रेल्वे प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला त्याचे काम पुन्हा नव्याने करण्यास सांगावे अशी मागणी वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले यांनी केली आहे.त्याच बरोबर हे काम त्वरित न केल्यास रेल्वे प्रशसना विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे