पुण्यात बेवारस वाहनांचा ‘डेंजर झोन’! वाहतूक विभाग आणि महापालिका करणार संयुक्त कारवाई

58

पुणे, ४ मार्च २०२५: पुणे शहरातील रस्त्यांवर धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या वाहनांमुळे शहरात अस्वच्छता पसरली आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. या परिस्थितीला गांभीर्याने घेत, पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरुवात कसबा मतदारसंघातून करण्यात आली असून, पुढील १५ दिवसांत सर्व बेवारस वाहने हटवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

शहरातील रस्त्यांवर सुमारे ४ हजार बेवारस वाहने असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी काही वाहने चोरीची आहेत, तर काही वाहनांचे मालकच सापडत नाहीत. यामुळे पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. या वाहनांमुळे आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत.

पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या आदेशानुसार, बेवारस वाहनांच्या मालकांना प्रथम नोटीस पाठवण्यात येणार आहे. नोटीस देऊनही मालक न सापडल्यास, वाहतूक पोलिस ही वाहने जप्त करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील. त्यानंतर या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले की, “गेल्या महिन्यात महापालिकेने ४५ बेवारस वाहने उचलली आहेत. जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी बाणेर येथे महापालिकेची जागा असून, कोंढव्यातही लवकरच नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, महापालिकेच्या खराब झालेल्या वाहनांचाही लवकरच लिलाव केला जाणार आहे.”

आमदार हेमंत रासने यांनी सांगितले की, “बेवारस वाहनांमुळे शहरात अस्वच्छता, आरोग्यविषयक समस्या आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही मोहीम अत्यंत आवश्यक आहे.”

या मोहिमेमुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल, तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणामही कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे