देहूमध्ये ‘शौर्य’ची करडी नजर; पालखी सोहळ्यासाठी बॉम्बशोधक पथकाची कसून तपासणी!

27
Shourya Dog Bomb Detection at Dehu Palkhi Sohala
देहूमध्ये 'शौर्य'ची करडी नजर;

Shourya Dog Bomb Detection at Dehu Palkhi Sohala: आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूगाव सध्या कडेकोट बंदोबस्ताखाली आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवडच्या बीडीएस (बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड) विभागाच्या ‘शौर्य’ नावाच्या प्रशिक्षित श्वानाने श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि परिसराची कसून तपासणी केली आहे.

येत्या १८ जून रोजी देहूगावहून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यात केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि परदेशातील पाहुण्यांसह लाखो वारकरी आणि भाविक सहभागी होतात. या प्रचंड गर्दीत सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी, तीन वर्षांच्या अनुभवी ‘शौर्य’ श्वानाने मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री संत तुकाराम मंदिर, भजनी मंडप, संस्थानचे कार्यालय, मंदिराच्या ओवऱ्या, देऊळवाड्याच्या तटबंदीचा बाहेरील भाग, इंद्रायणी नदीचा घाट परिसर, वैकुंठगमन मंदिर परिसर, भक्त निवास आणि गाथा मंदिर परिसर अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची ‘शौर्य’ने अतिशय बारकाईने तपासणी केली. या विशेष मोहीमेसाठी ‘शौर्य’ची खास नियुक्ती करण्यात आली होती, असे पथकाचे प्रमुख, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनंता चव्हाण यांनी सांगितले. ‘शौर्य’चा अनुभव मोठा असल्याने या सोहळ्यासाठी तो एक महत्त्वाचा दुवा ठरला आहे.

या तपासणी पथकात पोलिस उपनिरीक्षक प्रवीण ढोरजे, पोलिस हवालदार एस. इ. गोंधळी, पोलिस नाईक निलेश शेळके आणि पोलिस हवालदार व श्वान हस्तक अनुजा जंजिरे यांचा सक्रिय सहभाग होता. या पथकाने वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे लाखो भाविकांना निर्धास्तपणे सोहळ्यात सहभागी होता येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे