Dnyaneshwar Maharaj Palkhi Procession 2025 from Alandi: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र आळंदीनगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. आज रात्री माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार असून, लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.
आळंदीच्या दिशेने येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, यंदा सुमारे तीन ते चार लाखांहून अधिक भाविक या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण आळंदी नगरी हरिनामाच्या गजरात आणि “ज्ञानोबा तुकारामांच्या” अखंड जयघोषाने दुमदुमून गेली आहे. इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड अशा प्रमुख ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.

आज रात्री ८ वाजल्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात रात्री ९ ते ९:३० च्या सुमारास माऊलींची पालखी मंदिराच्या मुख्य महाद्वारातून प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. या सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. संपूर्ण शहरात एक हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

गुरुवारची नित्यनियमाची माऊलींची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी प्रस्थान करेल. मंदिराची आणि शहराची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर, फुलांनी सजवलेल्या आसनावर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आजोळघरात होणार आहे. पंढरीच्या दिशेने निघणाऱ्या या सोंडी सोहळ्यासाठी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. ही वारी केवळ एक प्रवास नसून, तो भक्तीचा, श्रद्धेचा आणि परंपरेचा एक अद्भुत सोहळा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे










































