Dr.BR.Babasaheb Dream of Buddhist Jain Unity: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. एका वेगळ्याच दूरदृष्टीने भारलेल्या बाबासाहेबांनी जर आणखी काही वर्षे या देशाला लाभली असती, तर त्यांनी बौद्ध आणि जैन धर्मामध्ये अभूतपूर्व ऐक्य घडवून आणले असते, असे मत अभ्यासक डॉ. अमोल देवळेकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विचारातून एका नव्या ‘श्रमण क्रांती’ची दिशा स्पष्ट होत होती.
डॉ. देवळेकर सांगतात की, बाबासाहेबांच्या जीवनातील अखेरच्या काही दिवसांच्या घटना पाहिल्या तर हे स्पष्ट होते. त्यांची धार्मिक उन्नती करण्याची तीव्र इच्छा होती. माई आंबेडकर, नानकचंद रत्तू आणि चांगदेव खैरमोडे यांच्या लेखनातूनही याचा प्रत्यय येतो. ६ डिसेंबर १९५६ रोजी होणाऱ्या जैन परिषदेत त्यांची भूमिका देशाला एक नवी दिशा देऊ शकली असती.
बौद्ध-जैन ऐक्याचा प्रारंभबिंदू: डिसेंबर १९५६ च्या घटना
४ डिसेंबर १९५६ रोजी जैन धर्मगुरुंनी बाबासाहेबांची भेट घेतली आणि दोन्ही धर्मांतील समान धाग्यांवर चर्चा केली. त्यांनी श्रमण परंपरेतील या दोन महत्त्वाच्या विचारधारांना एकत्र आणण्याची विनंती केली. बाबासाहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुसऱ्या दिवशी अधिक चर्चेसाठी वेळ निश्चित केला. ५ डिसेंबर रोजी जैन शिष्टमंडळासोबत झालेल्या भेटीत बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेला अंतिम रूप दिले. थकलेले असूनही त्यांनी जैन विद्वानांशी संवाद साधला आणि धार्मिक ऐक्याच्या मार्गांवर विचारमंथन केले.
जैन शिष्टमंडळाने ६ डिसेंबरला दिल्लीत होणाऱ्या संमेलनाची माहिती दिली आणि बाबासाहेबांना आपले विचार मांडण्याची विनंती केली. त्यांनी बाबासाहेबांना ‘श्रमण संस्कृति की दो धाराएँ,जैनिजम और बुद्धिजम’ हे पुस्तक भेट दिले, ज्यावर बाबासाहेबांनी सखोल चर्चा केली. बाबासाहेबांचे दोन्ही धर्मांवरील प्रभुत्व पाहून जैन विद्वान अत्यंत प्रभावित झाले.
बाबासाहेबांनी स्पष्ट केले की बौद्ध आणि जैन हे दोन भिन्न विचारप्रवाह नसून एकाच श्रमण परंपरेच्या दोन शाखा आहेत. त्यांच्यातील साम्यस्थळे पाहता, भविष्यात ते निश्चितच एकत्र काम करू शकतील. श्रमण परंपरेला पुनर्जीवित करणे हे एक ऐतिहासिक कार्य ठरू शकते, कारण दोन्ही धर्म माणसाला आत्म-कल्याणकारी आणि जागृत बनवतात. बाबासाहेबांच्या या विचारांनी जैन शिष्टमंडळ इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याची आणि या परंपरेचे पाईक होण्याची तयारी दर्शवली.
अशा प्रकारे, जर बाबासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण झाले असते, तर भारतात एक मोठी ‘श्रमण क्रांती’ झाली असती, जी देशाच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत मैलाचा दगड ठरली असती. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे