मुंबई, 30 डिसेंबर 2021: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. त्यातल्या त्यात मुंबईमध्ये कोरोना ने कहर केलेला दिसत आहे. कारण 24 तासात संक्रमित रुग्णांचा आकडा डबल झालाय. एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडं देशात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने आव्हान वाढवलं आहे. धारावीतही 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
परवा संपूर्ण राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा एकविशेच्या पुढे होता, मात्र काल एकट्या मुंबईचा आकडा पंचविशेच्या पुढे गेल्याने प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत. काल मुंबईत तेराशेच्या परवा कोरोना रुग्ण आढळून आले होते, मात्र आज जवळपास रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे ही स्फोटक वाढ सहाजिकच सर्वांची डोकेदुखी वाढवणारी आहे.
अशा स्थितीत राज्यात कोरोनाचा वेग रोखणं प्रशासनाला अवघड जाऊ शकतं. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की जर अशी प्रकरणे वाढत राहिली आणि संसर्गाचं प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर दिल्लीप्रमाणे येथे आणखी काही निर्बंध लादले जातील.
मुंबईत नवी नियमावली नागू
या स्फोटक रुग्णवाढीनंतर मुंबई महापालिकाही अलर्ट मोडवर आली आहे, मुंबई महापालिकेडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यात हॉटेल व उपहारगृहांचे दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. महानगरपालिका आणि पोलीस प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना आगमन प्रसंगी आरटीपीसीआर चाचणी आणि 7 दिवसाचे क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. हवाईमार्गे आलेल्या आणि लक्षणे नसलेल्या कोविडबाधित रुग्णांसाठी बीकेसी आणि नेस्को कोविड केंद्रात स्वतंत्र, निःशुल्क विलगीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मालाड आणि कांजूरमार्ग कोविड केंद्र तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे