जागतिक दूरसंचार दिनानिमित्त सरकार लॉन्च करणार ‘संचार साथी पोर्टल’

नवी दिल्ली १५ मे २०२३: नागरिकांचे चोरीला गेलेले किंवा हरवलेले फोन ब्लॉक आणि अचूकपणे ट्रॅक करण्या करता, १७ मे रोजी जागतिक दूरसंचार दिनानिमित्त केंद्र सरकार मोबाईल ब्लॉकिंग आणि ट्रॅकिंग सिस्टम सुरू करणार आहे. त्या सिस्टीम ला ‘संचार साथी पोर्टल’ असे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव हे अधिकृतपणे संचार साथी पोर्टल (CEIR) लाँच करणार आहेत.

लोकांना त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ब्लॉक आणि ट्रॅक करण्यास ही प्रणाली सक्षम असेल. ही सिस्टीम भारतभर सुरू करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या तिमाहीत ती संपूर्ण भारतात आणली जाईल. असे सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलीमॅटिक्स C-DOT चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चेअरमन राजकुमार उपाध्याय यांनी माध्यमांना सांगितले. C-DOT सध्या दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्य प्रदेशातील काही दूरसंचार कार्यालयांमध्ये या प्रणालीचा एक पायलट प्रकल्प चालवत आहे, जो आता संपूर्ण भारतात कार्यरत होईल.

अलीकडेच, कर्नाटक पोलिसांनी या पोर्टलच्या मदतीने २५०० हून अधिक हरवलेले मोबाईल परत मिळवून मालकाच्या ताब्यात दिले. सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलीमॅटिक्सच्या रिपोर्ट्सनुसार, या पोर्टलद्वारे आतापर्यंत ४ लाखाच्या वर हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. यासोबतच अडीच लाखांहून अधिक मोबाईल ट्रॅक करण्यात आले. तर ८००० फोनही जप्त केले गेले.

‘संचार साथी पोर्टल’ मध्ये काही युनिक फीचर्स आहेत,ज्या द्वारे आयएमईआय नंबर बदलल्यानंतरही फोन ट्रॅक करता येईल. मोबाइल चोरल्यानंतर डिव्हाइसचा आयएमईआय क्रमांक बदलला जातो, त्यामुळे मोबाइल ट्रॅक किंवा ब्लॉक करता येत नाही. पण हे पोर्टल IMEI नंबर बदलल्यानंतरही डिव्हाइस ट्रॅक आणि ब्लॉक करण्यास सक्षम असेल. तसेच या सिस्टीममध्ये एक अंगभूत यंत्रणा आहे जी मोबाईलच्या तस्करीलाही आळा घालेल.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा