अश्रुधारा, की पर्जन्यधारा ?

15
Tears or rain?
अश्रुधारा, की पर्जन्यधारा ?

भागा वरखाडे, न्यूज अनकट प्रतिनिधी

जगभरातील हवामानविषयक संस्था फेब्रुवारीपासून पावसाचा अंदाज वर्तवायला सुरुवात करतात. अजून तरी सृष्टीचक्र पावसावर अवलंबून आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत वेगवेगळ्या संस्था पावसाचा अंदाज व्यक्त करीत असल्या, तरी त्या सरासरीत पावसाचा अंदाज व्यक्त करतात. पाऊस किती दिवसात पडणार, दोन पावसांत किती दिवसांचे अंतर असणार, किती पाऊस पडणार याचा अचूक अंदाज अजूनही देता येत नाही. स्थानिक तसेच जागतिक हवामान बदलाचा पावसावर परिणाम होत असतो. त्यातच एका दिवशी चांगल्या पावसाची बातमी येते, तर दुसऱ्या दिवशी वेगळीच. त्यामुळे संभ्रम कायम राहतो, तसा तो आताही आहे.

पावसावर परिणाम करणारे अनेक घटक असतात. चक्रीय वादळे, ‘ला-नीना’, ‘एल-निनो’, अचानक तयार होणारे कमी दाबाचे पट्टे, स्थानिक बदल अशा अनेक घटकांचा पावसावर परिणाम होत असतो. त्यातच जागतिक हवामान बदलामुळे आता ऋतूचक्राला काही अर्थ राहिलेला नाही. डिसेंबरमध्ये उकडते आणि मार्च-एप्रिलमध्ये पाऊस पडतो. फेब्रुवारीत तापमान ३८ अंशाच्या पुढे जाते. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमान ४० अंशाच्या पुढे जाते. एरव्ही दमट असणारी मुंबई आता तापवून काढते. थंड हवेची ठिकाणे उष्ण झाली आहेत. हा सर्व हवामान बदलाचा परिणाम आहे. पावसावर केवळ शेतीच अवलंबून आहे, हा गैरसमज अगोदर दूर केला पाहिजे.

संपूर्ण सृष्टीचे चक्र पावसावर अवलंबून असते. चांगला पाऊस झाला, तर पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत नाही. पिके पुरेशी येतात. अन्नसुरक्षा राखली जाते. शेतीवर अवलंबून असणाऱ्या सुमारे ५८ टक्के लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न जसा सुटतो, तसाच चांगल्या आणि वेळेवर पडणाऱ्या पावसामुळे अन्नधान्य, भाजीपाला, फळे आदींचे उत्पादन झाल्यामुळे महागाईच्या दुष्टचक्राला सामोरे जावे लागत नाही.रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार चांगल्या पावसावर सुटकेचा निश्वास टाकू शकतात. अशा या पावसाकडे केवळ शेतकऱ्यांचेच लक्ष असते, असे नाही, तर सर्वंच समाजघटकांचे लक्ष असते. कारण शेतीतील उलाढालीवर वेगवेगळ्या घटकांची उलाढाल अवलंबून असते. खते, बी-बियाणे, औषधे, कीटकनाशके, लॉजिस्टिक, हमाल, मापाडी अशा प्रत्यक्ष घटकांबरोबरच धोरणकर्ते, वाहन उद्योग, सराफा उद्योग अशा अनेक अप्रत्यक्ष घटकांनाही पावसाची ओढ लागलेली असते.

पावसावर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांचा वर उल्लेख केला आहेच. भारताच्या नैऋत्य मॉन्सूनसाठी ‘ला नीना’ची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. कारण या हवामान प्रणालीमुळे चांगला पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण तयार होते; मात्र अलीकडेच अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासनाने (नोआ) ‘ला नीना’चा प्रभाव संपल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे २०२५ च्या मॉन्सूनबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. याचवेळी, ऑस्ट्रेलियाच्या हवामान तज्ज्ञांनीही हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरातील तटस्थ परिस्थिती ऑगस्ट-हिवाळ्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या घडामोडींमुळे भारतातील मॉन्सून कसा असेल, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. यंदाच्या मॉन्सूनवर ‘ला नीना’च्या अनुपस्थितीचा काय परिणाम होईल, आणि यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांवर काय परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेतले पाहिजे.

‘ला नीना’ ही ‘ईएनएसओ’ (एल निनो-सदर्न ऑसिलेशन) ची एक अवस्था आहे. त्यात प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा कमी होते. यामुळे भारतात नैऋत्य मॉन्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वाढते. गेल्या काही वर्षांत ‘ला नीना’च्या प्रभावामुळे भारतात समाधानकारक पाऊस पडला. त्याचा शेती आणि जलसाठ्यांवर सकारात्मक परिणाम झाला; मात्र अमेरिकेच्या ‘नोआ’ने ‘ला नीना’चा प्रभाव संपल्याचे जाहीर केले.  आणि सध्या प्रशांत महासागरात तटस्थ परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. ही तटस्थ परिस्थिती हिवाळ्यापर्यंत (डिसेंबर २०२५-जानेवारी २०२६) कायम राहण्याची शक्यता पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ ‘ला नीना’ किंवा ‘एल निनो’ यापैकी कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली मॉन्सूनच्या सुरुवातीच्या काळात सक्रिय नसेल.

ऑस्ट्रेलियाच्या ‘ब्यूरो ऑफ मेटरॉलॉजी’नेही ‘ला नीना’चा प्रभाव संपल्याचे मान्य केले असून, हिंदी महासागरातील परिस्थिती ऑगस्ट २०२५ पर्यंत तटस्थ राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हिंदी महासागरातील ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) हा मॉन्सूनसाठी आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा पश्चिम हिंदी महासागराचे पाणी पूर्वेकडील पाण्यापेक्षा जास्त गरम असते, (सकारात्मक आयओडी), तेव्हा भारतात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वाढते; मात्र सध्या ‘आयओडी’तटस्थ आहे आणि यामुळे मॉन्सूनच्या पावसाचे प्रमाण सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियासाठी ही तटस्थ परिस्थिती चिंतेची आहे, कारण ‘ला नीना’मुळे त्यांच्या देशात जास्त पाऊस पडतो आणि त्याचा अभाव शेती आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम करू शकतो. भारतासाठी ही परिस्थिती पूर्णपणे नकारात्मक नसली, तरी पावसाचे वितरण आणि प्रमाण याबाबत अनिश्चितता वाढवते.

पावसाचा अंदाज जाहीर :

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अलीकडेच २०२५ च्या मॉन्सूनसाठी प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. त्यात ‘एल निनो’चा प्रभाव नसेल, असे स्पष्ट केले आहे. २०२३ मध्ये ‘एल निनो’मुळे पाऊस सहा टक्के कमी झाला होता, तर २०२४ मध्ये ‘ला नीना’च्या सौम्य प्रभावामुळे आठ टक्के जास्त पाऊस नोंदवला गेला. यंदा ‘ला नीना’ आणि ‘एल निनो’ या दोन्हींच्या अनुपस्थितीत मॉन्सून सरासरीच्या आसपास (९६-१०४ टक्के) राहण्याची शक्यता आहे. खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’नेही यंदा पाऊस सरासरीच्या १०३ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत चांगला पाऊस अपेक्षित आहे. तथापि, ‘ला नीना’च्या अभावामुळे पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता आहे. पश्चिम आणि दक्षिण भारतात सरासरी किंवा जास्त पाऊस अपेक्षित असला, तरी ईशान्य भारत आणि काही उत्तरेकडील भागांत पाऊस कमी पडू शकतो.

केरळमध्ये मॉन्सून वेळेवर (एक जूनच्या आसपास) दाखल होण्याची शक्यता आहे; पण जून महिन्यात पावसाचा जोर कमी राहील. जुलैपासून मॉन्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाज आहे. ‘ला नीना’चा प्रभाव संपल्याने आणि तटस्थ परिस्थितीमुळे मॉन्सूनपूर्व काळात (एप्रिल-जून २०२५) भारतात उष्णतेची लाट अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. सामान्यपणे या काळात ४-७ उष्णतेच्या लाटेचे दिवस अनुभवले जातात; पण यंदा विशेषतः पूर्व भारतात (बिहार, ओडिशा, झारखंड) दहा दिवसांपर्यंत उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज ‘आयएमडी’ ने वर्तवला आहे. यामुळे शेती, आरोग्य आणि ऊर्जा वापरावर परिणाम होऊ शकतो. ‘प्री-मॉन्सून’ पावसाची शक्यता कमी असली, तरी मे महिन्याच्या शेवटी काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. ‘ला नीना’चा प्रभाव संपल्याने आणि तटस्थ परिस्थितीमुळे भारतात दुष्काळ किंवा अतिवृष्टी यांसारख्या टोकाच्या परिस्थितींची शक्यता कमी आहे, ही बाब सकारात्मक आहे.

तटस्थ परिस्थितीमुळे पाऊस सरासरीच्या जवळपास राहील. त्यामुळे शेती आणि जलसाठ्यांसाठी स्थिरता मिळेल. तथापि, पावसाचे असमान वितरण ही चिंतेची बाब आहे, कारण काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. याशिवाय, हिंदी महासागरातील तटस्थ ‘आयओडी’मुळे मॉन्सूनच्या सुरुवातीला कमकुवत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामावर परिणाम होऊ शकतो. ‘ला नीना’चा प्रभाव संपल्याने २०२५ चा मॉन्सून भारतासाठी सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे; पण पावसाचं वितरण आणि तीव्रता याबाबत अनिश्चितता कायम आहे.

 प्रशांत आणि हिंदी महासागरातील तटस्थ परिस्थितीमुळे दुष्काळ किंवा अतिवृष्टी यांसारख्या टोकाच्या परिस्थिती टाळल्या जाऊ शकतात; पण स्थानिक पातळीवर पावसाचे असमान वितरण शेती आणि जलव्यवस्थापनासाठी आव्हान ठरू शकते. ऑस्ट्रेलियासाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे, कारण कमी पावसामुळे त्यांच्या शेतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान विभाग आणि ‘स्कायमेट’ यांचे अद्ययावत अंदाज मे अखेर अधिक स्पष्टता आणतील; पण सध्या शेतकरी आणि धोरणकर्त्यांनी तटस्थ परिस्थितीचा विचार करून नियोजन करणे गरजेचे आहे.