नवी दिल्ली, दि. ८ जुलै २०२०: कोविड -१९ च्या काळात सर्वच उद्योगधंदे मोडकळीस आले आहेत. अर्थव्यवस्थेला चालना नसल्यामुळे तसेच रोजगार नसल्यामुळे याचा परिणाम बँकांवर देखील झाला आहे. या काळात बँकिंग क्षेत्र देखील कोलमडले आहे. मात्र भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आय सी आय सी आय बँक ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. तब्बल ८० हजार फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय आयसीआयसीआय बँकेने घेतला आहे.
वेतनात ८ टक्क्यांनी वाढ
कोविड -१९ च्या काळामध्ये सर्वच उद्योगधंदे तसेच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे पगार कापले जात आहेत. इतकेच काय तर सरकारी नोकरदारांचे देखील वेतनामध्ये कपात होताना दिसत आहे. अशा स्थितीत आयसीआयसीआय बँकेने घेतलेले हे पाऊल बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आहे. बँकेने आपल्या ८० हजार ‘फ्रंटलाइन’ कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, कोरोना संकटकाळात काम केल्याचे या ८० हजार कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यात आले आहे. त्यांच्या पगारात ८ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
वेतनवाढ कधी व कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी
ही वेतन वाढ ए १ श्रेणीतील कर्मचाऱ्यांमध्ये तसेच या खालील श्रेणीमध्ये येणाऱ्या सर्व फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आली आहे. फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांमध्ये असे कर्मचारी येतात जे प्रत्यक्षात ग्राहकाशी संपर्क साधतात किंवा भेट घेतात. मिळालेल्या माहितीची पुष्टी करण्यासाठी बँकेला ई-मेलद्वारे विचारण्यात आले होते मात्र बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तथापि सूत्रांच्या म्हणण्यानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ही पगारवाढ करण्यात आली असून जुलै महिन्यापासून ही वाढ लागू होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी