माढा, २ डिसेंबर २०२०: वृत्तांत असा की माढा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथील, ३५ वर्ष सरपंच पदावरून गावाची सेवा करणारे शत्रुघ्न सुबराव परबत -पाटील यांचे रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी, ८५ व्या वर्षी निधन झाले होते. मंगळवारी तिसऱ्या दिवशी त्यांची रक्षा व अस्थी( हाडे )नदी किंवा विहिरीतील पाण्यात न टाकता त्यांच्या पत्नी श्रीमती केशरबाई परबत पाटिल, मुलगी मंदाकिनी भीमराव शेळके व मुलगा प्रभाकर परबत पाटील यांनी नातेवाईकांच्या समवेत त्यांच्या शेतात पाच झाडे लावून त्या खाली अस्थि व राखेचे विसर्जन केले.
या बाबत त्यांचे सुपुत्र व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर परबत -पाटील म्हणाले की, मृत व्यक्तीवर अग्नी संस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याची रक्षा व अस्थी नदी किंवा विहिरीतील पाण्यात विसर्जीत केले जातात. यामुळे पाणी दूषित बनते व पर्यावरणाला हानी पोहोचू शकते. ही जूनी पद्धत बंद करून पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून आम्ही परबत- पाटील कुटुंबीयांनी रक्षा विसर्जनाची नवीन वेगळी पद्धत सुरू केली आहे.
याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या शेतात आमच्या वडिलांच्या अस्थी व रक्षा यांचे बेल, सीताफळ, पेरू ,आंबा व चिंच या पाच झाडांचे वृक्षरोपण करून त्यांच्या बुडात विसर्जन केले आहे. यामुळे भविष्यकाळात या झाडापासून ऑक्सिजन मिळेल व भावी पिढीला फळेही मिळतील. अस्थी विसर्जनाची पाण्यात विसर्जनाची जुनी परंपरा मोडून, पर्यावरण दूषित होऊ नये म्हणून यापुढे आम्ही असाच प्रकारे पायंडा पाडणार आहोत व त्याचा प्रचारही करणार असुन जनजागृतीही करणार असल्याचे प्रभाकर परबत- पाटील यांनी सांगितले, त्यांच्या या उपक्रमाचे अनेक सुज्ञ नागरिक व पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील