कात्रजमध्ये बंदी असलेल्या ‘बॉडी बिल्डिंग’ इंजेक्शनचा साठा जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हा

पुणे : शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डिंग) तसेच नशेसाठी गैरवापर होणाऱ्या बंदी असलेल्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीवर आंबेगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत Mephentermine Sulphate Injection IP (Mephivan) या इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अथर्व इंद्रजित शिंदे (24), अविनाश शिवा बळुंगी (22), प्रदीप जितेंद्र हुंबरे (26), पियुष गणेश भरम (26) आणि लक्ष्मण परमेश्वर माने (36) यांच्याविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-दत्तनगर रोडवरील आनंद दरबारजवळ सार्वजनिक रस्त्यावर 24 जुलैच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडे औषध विक्रीचा कोणताही वैध परवाना नसताना Mephentermine Sulphate Injection IP (Mephivan) या इंजेक्शनचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. हे इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरणे धोकादायक असून त्याचा शरीरसौष्ठवासाठी तसेच नशेसाठी गैरवापर होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 318/2026 नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 275, 278, 125 तसेच औषधे व प्रसाधने अधिनियम, 1940 मधील कलम 18(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे व त्यांच्या पथकाने केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – दिनेश वढणे