रक्त आणि अश्रूंनी भरलेला स्वर्ग

12
Terrorist attack in Pahalgam
पहलगाम दहशतीने हादरले;

न्यूज अनकट प्रतिनिधी,भागा वरखाडे

काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केलेला हल्ला निषेधार्हच आहे. हमास ही संघटना इस्त्रायली नागरिकांची जशी धार्मिक द्वेषातून हत्याकांड घडवून आणते, तसाच प्रकार आता पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने केला आहे. धर्म पाहून हत्या करण्याची मानसिकता आजच रुजली आहे, असे कुणाला वाटण्याचा संभव आहे; परंतु परिस्थिती तशी नाही. धार्मिक विद्वेष इतका टोकाला गेला आहे, की पूर्वी झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीच्या वेळी ही कपडे उतरवून हल्ले झाल्याचा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती आता पहलगाममध्ये झाली आहे.

काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जण ठार झाले. यातील पाच पर्यटक महाराष्ट्रातील रहिवासी होते. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा समावेश आहे. पुण्यातील दोन पर्यटकही ठार झाले आहेत. पहलगामच्या बैसरन खोरे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. तिथली नदी, तिथला पर्वत, त्याची उंच शिखरे, त्याला टेकलेले ढग,  पाइनची उंच झाडे, मऊ हिरवे गवत पसरलेले मैदान, बर्फाच्छादित पर्वतशिखरे नजरेत साठवून ठेवण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक तिथे येत असतात. हे सर्व पाहिले म्हणजे स्वर्गाचा मार्ग इथूनच जात असावा असे वाटेल. काश्मीरचा उल्लेख नंदनवन असा केला जात असावा.  आज पहलगामची ही बैसरन दरी रक्त आणि अश्रूंनी भिजली आहे.

ही दरी रडत आहे. मंगळवारी भेकड आणि भ्याड दहशतवाद्यांच्या एका गटाने पर्यटकांना त्यांचा धर्म आणि नावे विचारली. बैसरणच्या हिरव्यागार उतारावर, जिथे मुले हसत-खेळत आनंदात हरवून गेली होती आणि कुटुंबे घोडेस्वारीचा आनंद लुटत होती, तिथे अचानक आलेल्या गोळ्यांनी सर्व काही हिरावून घेतले. धर्माबाबत विचारणा करून झालेल्या या निर्घृण हत्येने २८ निष्पापांचा जीव घेतला. या खोऱ्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणतात. येथे झालेल्या हल्ल्याची तुलना आता ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी केली जात आहे. इस्रायलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी १,२०० लोक मारले, तेव्हा असाच प्रकार झाला होता. रीमजवळील नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या २५० इस्रायलींचा समावेश होता. याशिवाय हमासच्या दहशतवाद्यांनी २५० इस्रायलींनाही ओलीस ठेवले होते. या दोन्ही घटनांमध्ये द्वेषाने ओथंबलेल्या काही दहशतवाद्यांनी आनंदाच्या क्षणाचा आनंद लुटणाऱ्या नि:शस्त्र आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले.

पहलगाममध्ये, पाकिस्तान प्रायोजित ‘टीआरएफ’ दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, त्यांना अजान वाचण्यास सांगितले आणि त्यांना गोळ्या घातल्या. इस्रायलवरील हल्ल्यात, हमासच्या दहशतवाद्यांनी निवडकपणे गाझा सीमेजवळील ज्यू नागरिकांची हत्या केली. दोन्ही हल्ल्यांमध्ये धर्माच्या आधारे लोकांना निवडण्याचे दहशतवाद्यांचे धोरण स्पष्टपणे दिसून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी या संपूर्ण घटनेची व्हिडीओग्राफी केली. दहशतवाद्यांनी मुख्य घटनास्थळी सर्वांना एकत्र केले, त्यांना ओळखले आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला. इस्रायलमध्ये हा हल्ला करण्यासाठी हमासच्या दहशतवाद्यांनी रॉकेट बॅरेज, पॅराग्लायडर आणि वाहनांचा वापर केला, तर पहलगाममध्ये लष्कराचा गणवेश घातलेल्या चार ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचे समजते. वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी या ठिकाणाचा रेकी आधीच केली होती. आपल्या गुप्तचर यंत्रणेला ते का लक्षात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.

गेल्या काही वर्षांत दहशतवादाला पायबंद घातला असल्याचा दावा केला जात होता. काश्मीर तुलनेने शांत होते. काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यांतर तिथे फार काही गडबड झाली नाही. काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात होत्या.  काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले अधूनमधून होत होते, तरीही मोठ्या घटना होत नसल्याने तिथल्या अर्थव्यवस्थेचा मोठा कणा असलेला पर्यटन उद्योग बहरत चालला होता. बुऱ्हाण वाणी चकमकीत मारला गेल्यानंतर वर्षभर काश्मीरचा पर्यटन व्यवसाय अडचणीत आला होता. अमेरिकेचे अध्यक्ष असताना बिल क्लिंटन भारतात आले, तेव्हा काश्मीरमध्ये शीखांचे मोठे हत्याकांड घडवून आणले होते. त्यानंतरचा हा दुसरा मोठा हल्ला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे उपाध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर असताना हे नृशंस हत्याकांड घडले. पुलवामा हल्ल्यात आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला होता. तिथे 44 जवानांना हौतात्म्या आले. त्याचा बदला भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईक करून घेण्यात आला.

आता पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकार कामाला लागले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पर्यटनाचा हंगाम आहे. या वेळी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांची मोठी वर्दळ असते. येथे मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. हे ठिकाण तुलनेने शांत मानले जाते. त्यामुळे येथे सुरक्षा तैनात नव्हती. याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केला. हमासचा हल्ला हा इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पेटवण्याचा आणि प्रादेशिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होता. तसाच तो पहलगाममध्ये दोन धर्मियांत दरी निर्माण करण्याचा आहे. गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने सामान्य होत होती. तिथे पर्यटकांची ये-जा सुरू होती. सिनेमागृहे सुरू होती. बाजारपेठा अधिक चैतन्यमय होत होत्या. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे दिसत होते; पण हा सकारात्मक बदल दहशतवाद्यांच्या हेतूवर आणि अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत होता. त्यामुळे पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले होते. यानंतर घाबरून हे हल्ले करण्यात आले.

हे दोन्ही हल्ले मोठ्या भू-राजकीय उद्दिष्टांनी प्रेरित होते. इस्रायलमधील हमासचे हल्ले आणि ‘टीआरएफ’ने केलेले हल्ले यांनी खोलवर सामाजिक आणि भावनिक जखमा सोडल्या आहेत. इस्रायलमध्ये, राष्ट्रीय एकात्मतेला हादरा देणाऱ्या होलोकॉस्टनंतर ज्यूंवरचा सर्वात प्राणघातक हल्ला असे या हल्ल्याचे वर्णन केले गेले. या हल्ल्यानंतर इस्रायलने ८ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझा पट्टीमध्ये हमासच्या विरोधात ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ सुरू केले. इस्रायलने हमासविरुद्ध छेडलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे युद्ध आहे.  इस्रायलने या युद्धासाठी तीन मुख्य उद्दिष्टे ठेवली होती, हमासचा खात्मा, ओलीस परत आणणे आणि गाझा सीमेजवळ राहणाऱ्या रहिवाशांची सुरक्षा. आता भारत कोणती नीती वापरतो, हे पाहायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता ‘ॲक्शन मोड’वर आले असून त्यांच्या कारवाईआधीच या हल्ल्याशी संबंध नसल्याचे पाकिस्तानने सांगायला सुरुवात केली आहे. जगाचा संताप लक्षात घेऊन पाकिस्तानचे वक्तव्य येत असले, तरी त्याचे शेपूट अजून वाकडे ते वाकडेच आहे.

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ‘टीएएफ’ नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संघटनेने यापूर्वीही लक्ष्य हत्या केल्या आहेत. ही संघटना गैर-काश्मिरी,  मजूर, शीख आणि हिंदूंना लक्ष्य करते. लष्कराचा गणवेश घातलेल्या क्रूर दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोर ‘आयबी’ अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या. दहशतवादी पहलगाम आणि नंतर जम्मूमधील किश्तवाडहून दक्षिण काश्मीरमधील कोकरनाग मार्गे बैसरन येथे पोहोचले असावेत.  पर्यटकांची वाढती संख्या पाहता आणि अमरनाथ यात्रा विस्कळीत करण्यासाठी दहशतवाद्यांनी हे घृणास्पद कृत्य केले असावे.  तीन जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांनी पर्यटकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि परिस्थिती बिघडवण्यासाठी हे ठिकाण निवडले.  अमरनाथ यात्रेसाठी पहलगाम मार्ग महत्त्वाचा आहे.

 या मार्गावरून गुहेपर्यंत पोहोचायला तीन दिवस लागतात; पण वाट सोपी आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक हे ठिकाण निवडले असावे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील जनताही दुखावली आहे. इतकेच नाही, तर काश्मीरच्या मशिदींमधून घोषणा देण्यात आल्या. या घटनेचा निषेध करण्यात आला. अशा लोकांवर सरकारने कारवाई करावी, असे आवाहन करण्यात आले. काश्मीरमधील बदललेल्या वातावरणाचे हे एक चांगले उदाहरण आहे. कारण आता दहशतवाद्यांचे समर्थक तिथे दिसत नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर तेथील लोकांनी कँडल मार्च काढला. त्याचा प्रतिध्वनी पाकिस्तानपर्यंत नक्कीच पोहोचेल. हल्ल्याच्या दोन तासांनंतर काश्मीरच्या मशिदींमधून ऐतिहासिक घोषणा देण्यात आल्या. पहलगाम हल्ला इस्लाम आणि मानवतेच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले. दहशतवादाला कोणताही धर्म नसून हा हल्ला काश्मीरची शांतता आणि एकता नष्ट करण्याचा कट आहे. काश्मीर हे आमचे घर आहे आणि ते आम्ही दहशतवाद्यांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असा इशारा तिथल्या नागरिकांनी दिला. हा बदल नक्कीच चांगला आहे.