पुणे, ४ मार्च २०२५: पुण्याची ओळख ‘हिल स्टेशन’ म्हणून असली, तरी आता हे शहर ‘उष्णतेचे बेट’ बनले आहे. सोमवारी (दि. ३) राज्यातील सर्वाधिक तापमान लोहगावात नोंदवले गेले. येथील कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस होते.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्यातील तापमानात दोन-तीन अंशांनी वाढ झाली आहे. वडगावशेरी, मगरपट्टा, कोरेगाव पार्क या भागातील तापमान अधिक नोंदवले जात आहे. तर शिवाजीनगरला कमाल तापमान ३७.७ अंश सेल्सिअस होते.
पुण्यात किमान तापमान १७ अंश आहे. पुढील दहा दिवसांमध्ये कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान आता आहे तसेच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यातील कमाल तापमान: लोहगाव (३९.६ अंश), जळगाव (३८.९ अंश), सोलापूर (३८.६ अंश), मालेगाव (३८.० अंश), मुंबई (३१.८ अंश), महाबळेश्वर (३७.१ अंश).
“राज्यामध्ये सर्वात अधिक कमाल तापमान लोहगाव येथे नोंदवले गेले. हा स्थानिक पातळीवरील परिणाम असू शकतो. त्या भागामध्ये बांधकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे जमीन तापते आणि वातावरणदेखील तप्त राहते. परिणामी लोहगावात अधिक तापमान नोंदले गेले असावे,” असे निवृत्त हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
पुण्याची एकेकाळची ओळख ही ‘हिल स्टेशन’ होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये येथील बांधकामे वाढली, वाहने वाढली. त्यामुळे आता सर्वाधिक ‘हॉट’ किंवा उष्णतेचे बेट म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे