उरुळी कांचन, ७ ऑगस्ट २०२०: उरुळी कांचन येथे दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे पुलाखालून पलीकडच्या नागरी वस्तीत या अनेक वाड्यांना जाणारा रस्ता पाण्यात बुडून गेला आहे.
रेल्वे पुलाखाली पाणी साठले की त्यातून जाताना मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनांना सुमारे तीन किलोमीटरचा वळसा घालून कोरेगाव मुळ रेल्वे गेट रस्त्याने जावे लागत आहे.
याबाबत दरवर्षी प्रशासनाला नागरिकांकडून निवेदन दिले जाते मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार संतोष बबन कांचन, संतोष सिताराम बगाडे, यांनी केली आहे. या समस्या सोडवण्यासाठी आज पुन्हा एकदा उरुळी कांचन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी के. जी . कोळी यांना निवेदन दिले, यावेळी उपसरपंच भाऊसाहेब माजी सदस्य संतोष कांचन, सुनील तांबे, धनंजय फराटे, गणेश खैरे, किरण तांबे, व इतर नागरिक उपस्थित होते.
निवेदनात असे म्हटले आहे की, उरुळी कांचन रेल्वे पूल ते आयपीएम आय गेट रोड दुरूस्ती, प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व वस्त्यावर पथदिवे व पुलाखाली पाण्यामुळे नागरिकांची होणारी वाहतुकीची अडचण त्यासंदर्भात पंधरा दिवसात कमी नाही झाली तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
उरुळी कांचन रेल्वे लाईन व पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग यांनी उरळीकांचन गावठाणाचे तीन तुकडे केले असून यापैकी रेल्वेच्या पलीकडे असणारा प्रभाग क्रमांक तीन हा भाग पावसाळ्यात नेहमीच दळणवळण सोयी सुविधांपासून वंचित राहत व रेल्वे लाईनच्या पुलाखालून या भागात जाण्यासाठी रस्ता आहे परंतु दौंडला ज्या पद्धतीने कुरकुंभ मोरीच्या रस्त्याचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. तशाच पद्धतीने उरुळी कांचन मधील रेल्वेच्या पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याचा प्रलंबित आहे.
पाच- सात हजार नागरिकांचा तुटतो संपर्क
सुमारे साडेपाच ते सहा हजारांहून अधिक नागरिक या भागात राहतात व जवळपास दहा ते बारा वाड्या वस्त्यांवर व गावाला जाणारा नागरिक या रस्त्याचा वापर करीत असल्याने त्यांचा संपर्क नेहमी पावसाळ्याच्या पाण्यामुळे खंडीत होत आहे व ग्रामपंचायत प्रशासन अनेक वेळा नागरिकांनी मागणी करूनही या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्याबाबत वेळ काढूपणाचे धोरण राबवित आहे. अशी तक्रार या भागातील नागरिक करीत आहेत लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाहीत अशी खंत संतोष कांचन व संतोष सिताराम बगाडे, यांनी व्यक्त केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे