सौरभ चंडीदास गांगुली
जन्म; जुलै ८, इ.स. १९७२ भारताकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.
गांगुली डावखुरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे. भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू आहे. त्याने भारतीय खेळाडूंपैकी पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढल्या आहेत. गांगुली भारताकडून ३०० पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे याप्रकारच्या सामन्यात सचिन तेंडुलकर नंतर सर्वाधिक धावा त्याने काढल्या आहेत. गांगुलीच्या नावे १५ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय सामन्यांतली शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,००० धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.
गांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने २१ सामन्यांत विजय मिळवला. याशिवाय गांगुली २००३ च्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय संघनायक होता.