कळंब, दि. १८ मे २०२० : मौजे तांदुळवाडी येथे आज (सोमवारी) सकाळी ९ वाजता काळे – डिकले परीवारांचा शिवविवाह सोहळा शिवधर्म पद्धतीने सोशल डिस्टस्टिंगचे पालन करत आनंदी वातावरणात पार पडला. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी आपल्या मुलाचा शिवविवाह अगदी साध्या पद्धतीने करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
या शिवविवाह सोहळ्याची सुरूवात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम बापू कुंजीर यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
सध्या जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने करून देशाला काहीतरी हातभार लागावा, या उद्देशाने काळे परीवाराच्या वतीने खर्चात बचत करत मुख्यमंत्री सहायता निधीला ११ हजार रुपये रकमेचा धनादेश दिला. हा धनादेश शासन प्रतिनिधी तलाठी प्रविण भातलंवडे, ग्रामसेविका यु.एन. झगडे यांच्याकडे वधुवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
यावेळी शिवविवाह सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थित योग्य सामाजिक अंतर ठेवून सॅनिटाइजर तसेच मास्कचा वापर करून पार पाडण्यात आला. शिवविवाहाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, राष्ट्रसंत जगतगुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनेने करण्यात आली.
त्यानंतर योगेश्वर अंबाड यांनी शिवपंचके म्हणून विवाह पार पाडला. वधुवरांच्या अंगावर अक्षता म्हणून धान्याची उधळण न करता फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच लग्नानंतरही सोहळा , सत्यनारायण यासारखे विधी केले जाणार नाहीत, असा त्यांनी निर्णय घेतला.
या शिवविवाह सोहळ्यास संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अतुल गायकवाड, तुकाराम काकडे, पोलिस पाटील विलास काळे या मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्य पार पडले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड