सिंधुदुर्ग, १५ सप्टेंबर २०२०: दक्षिण वाऱ्यांमुळे समुद्र खवळला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. स्थानिक लोकांबरोबरच गुजरात राज्यातल्या नौकासुद्धा देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. गेले दोन-तीन दिवस दक्षिण वाऱ्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल होत आहेत.
समुद्रातल्या पाण्याचा प्रवाह हा दक्षिण-उत्तर जोराने वाहत आहे. त्यामुळे नौका मार्गक्रमण करताना अवघड होत. समुद्रातल्या या परिस्थितीमुळे देवगड बंदरातल्या सर्व नौका बंदरात परतल्या आहेत. त्याचबरोबर पर जिल्ह्यातल्या आणि परराज्यातल्या नौकासुद्धा देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. दोन-तीन दिवसात वातावरण निवळेल असा जाणत्या मच्छीमारांचा अंदाज आहे.
दरम्यान गणेशोत्सवानंतर मासेमारी हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. पापलेट, सुरमई, कोळंबी आदी किंमती मासळी मत्स्य प्रेमींसाठी पर्वणीच ठरत होती. मात्र, सध्या किनारपट्टीवर वादळी वातावरण तयार झाल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी