टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल: ‘लाल चिखल’ बनला डोकेदुखी!

19

ओतूर ४ मार्च २०२५: माळशेज परिसरात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. कमी वेळेत अधिक उत्पन्न देणाऱ्या टोमॅटोचे भाव यावर्षी अक्षरशः मातीमोल झाले आहेत. नारायणगाव उपबाजारात 20 किलोच्या कॅरेटला केवळ 80 ते 150 रुपये भाव मिळत आहे. वाहतूक खर्च, मजुरी आणि इतर खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही.

ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, उदापूर, डिंगोरे, ठिकेकरवाडी आणि डुंबरवाडी या भागातील अनेक शेतकरी टोमॅटोचे पीक घेतात. या पिकाला लागवडीपासून मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. कीटकनाशके, खते, बांबू, तारा, सुतळी आणि मजुरी यावर मोठा खर्च होतो. मात्र, सध्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

एका एकरात पाच हजार किलोपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या या भागात मोठी आहे. मागणी घटल्याने आणि उत्पादन वाढल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. या लाल चिखलाने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.

“कॅरेटला 80 ते 150 रुपये भाव मिळतो. हा भाव परवडणारा नाही. भांडवली खर्च वाया गेला आहे. पुढे भाव मिळेल आणि पैसे मिळतील या आशेवर आम्ही आहोत,” तेजस घोलप या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने सांगितले.

अवकाळी पाऊस आणि मातीमोल भावामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची पिळवणूक होत असताना व्यापारी मात्र नफा कमवत आहेत, असे चित्र आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा