Mumbai Uddhav Thackeray : अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काहीही नाही. पण कंत्राटदारांसाठी भरगच्च घोषणा त्यांनी केल्या. मुंबईमध्ये ६४ हजार ७८३ कोटींची कामे होणार असल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा सामन्यांच्या नव्हे तर कंत्राटदारांच्या विकासासाठी आहे. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भडकले असून यंदाचा अर्थसंकल्प मागील दहा हजार वर्षांतील सर्वांत बोगस असल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे.
सोमवारी महायुती सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर ते बोलत होते. आजचा अर्थसंकल्प पाहून मला आचार्य अत्रे यांची आठवण झाली. असा बोगस अर्थसंकल्प मी मागच्या दहा हजार वर्षात पाहिला नाही असे ते म्हणाले. ” मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी “,अशी खोचक टीका ठाकरे यांनी केली. ” पूर्वीपासून सुरू असलेली अर्ध्याहून अधिक कामे या सरकारने अर्थसंकल्पात सांगितली आणि त्यात काहीच नवीन नाही. हा अर्थसंकल्प ‘उद्या करू, परवा करू,नंतर करू’ अशा पद्धतीचा आहे. हा अर्थसंकल्प बोगस असून मागील अनेक वर्षात मांडला गेला नसेल. असे ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले ” महायूती सरकारने लाडक्या बहीणींसाठी २१०० रुपये देण्याची हमी दिली होती. पण त्यावर या अर्थसंकल्पामध्ये काहीही नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासनावरही यात काही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना माझे नाव भाषणात घेतले होते. स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, असे ते म्हणाले होते. जर तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचे असेल तर दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतात.”
प्रथमेश पाटणकर,न्यूज अनकट प्रतिनिधी