इंदापूर, २५ डिसेंबर २०२०: इंदापूर तालुक्यातील मंगल कार्यालयात एका महिलेच्या गळ्यातील सोने चोरण्याची घटना घडली, त्यानंतर अवघ्या आठ तासात वालचंदनगर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची सूत्रे फिरवत चोरटे जेरबंद केले आणि त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतुलनीय कामगिरी घडली.
पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ रोजी आनंदनगर येथील जनाई मंगल कार्यालयाबाहेर उदय गणपत देशमुख यांच्या पत्नी उज्वला देशमुख (रा. आनंदनगर ता. इंदापुर जि. पुणे) या जनाई मंगल कार्यालयाच्या बाहेर थांबलेल्या असताना अचानकपणे एक मोटारसायकल दोन अनोळखी चोरट्यांनी देशमुख यांच्या गळ्यातील सोन्याचा ८० ग्रॅम वजनाचा व ३ लाख २० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा गंठण बळजबरीने हिसका मारुन तोडुन चोरुन नेला होता.
यानंतर पोलिसांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला हा गुन्हा घडल्यानंतर लागलीच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सूचना दिल्या. दुसरीकडे दिलीप पवार यांनी तातडीने पथके नेमून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. या दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शुभम आनंद किरतें (वय २४ वर्षे रा. आनंदनगर ता. इंदापुर जि. पुणे) व अजित बापु भोसले (वय २४ वर्षे रा. आनंदनगर ता. इंदापुर जि. पुणे) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.
या दोघांकडून पोलिसांनी ८० ग्रॅम वजनाचे ३ लाख २०हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मिळुन एकुण ३ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे