पुणे, ता. ३० डिसेंबर २०२२ : ता. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून राज्यात तस्करी केल्या जाणारा सुमारे दोन कोटी रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने पकडला. या कारवाईत दोन ट्रक आणि तब्बल दोन हजारांहून अधिक दारूचे बॉक्स जप्त केले आहेत. ही कारवाई सासवड आणि तळेगाव दाभाडे परिसरात केली. याप्रकरणी रमेश कुमार झुंजराम डुड्डी, बाबूलाल त्रिलोकराम, शेखर तानाजी भोसले, अभिजित दिगंबर डोंगरे, रोहित जालिंदर खंदारे, वीरा राम, पुनामा राम चौधरी या सात आरोपींना अटक करण्यात आले आहे.
राज्यात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मद्यसेवन केले जाते. त्यासाठी गोवा राज्यनिर्मित मद्याची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाला तळेगाव दाभाडे येथील सोमाटणे फाटा; तसेच सासवड विभागातील वडगाव बुद्रुक गावच्या हद्दीत पुणे–बंगळुरू महामार्गावर संशयित कंटेनर आढळले. या वाहनचालकांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे तळेगाव विभागाच्या पथकाने वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये विविध कंपन्यांचे बनावट मद्याचे ९६० बॉक्स आढळून आले. बाजारपेठेत या बॉक्सची ७० लाख ८४ हजार ८०० रुपये एवढी किंमत आहे. याबरोबरच बाराचाकी वाहन व मोबाईल असे मिळून एकूण ९० लाख ९४ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर सासवड विभागाने वडगाव बुद्रुक येथील महामार्गावर एका दहाचाकी कंटेनरवर कारवाई करीत ९१ लाख ७७ हजार ६०० रुपयांचे ६१० बॉक्स आणि चारचाकी कार असे मिळून ८४ लाख ८७ हजार ६०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक केली. एकूण एक कोटी ७५ लाख ८२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यादरम्यान वाहनचालकांकडे कोणताही वाहतूक परवाना आणि कागदपत्रे आढळून आली नाहीत. हा अवैध मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाचे उपायुक्त अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या देखरेखेखाली निरीक्षक दीपक सुपे, पी. सी. शेलार, एस. एम. सराफ, राजेंद्र झोळ, आर. एम. सुपेकर, भोसले, नेवसे, भरणे, संदीप मांडवेकर, सागर दुर्वे, तात्या शिंदे, राहुल जौजाळ आदी अधिकारी कर्मचारी यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सासवड, तळेगाव दाभाडे विभाग करीत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील