मुंबईकरांना ‘ओला-उबर’ प्रवास महागला! आता प्रति किलोमीटरसाठी मोजा २२.७२ रुपये

मुंबईतील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ओला आणि उबर सारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांनी आपले दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना प्रति किलोमीटरसाठी २२.७२ रुपये मोजावे लागणार आहेत. या नव्या नियमांमुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

नव्या नियमानुसार, मागणीच्या (पीक) वेळेत भाडे १.५ पटीने वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पीक अवर्समध्ये प्रति किलोमीटरचा दर ३४ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. याउलट, मागणी नसलेल्या (नॉन-पीक) वेळेत २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे याच वेळेत प्रवाशांना प्रति किलोमीटर १७ रुपये भाडे द्यावे लागेल.

हा बदल केवळ प्रवाशांसाठीच नाही, तर चालकांसाठीही महत्त्वाचा आहे. या नव्या नियमांनुसार, चालकांना प्रत्येक फेरीच्या भाड्याच्या ८० टक्के रक्कम मिळणार आहे. त्यामुळे चालकांचे उत्पन्न निश्चित आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे.

प्रवाशांसाठी भाडे निश्चित झाल्यामुळे आता गोंधळ कमी होईल, असा दावा केला जात आहे. मात्र, या दरवाढीमुळे मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक ताण पडणार हे निश्चित आहे. नव्या भाड्यामुळे पारदर्शकता आणि न्याय मिळेल, अशी अपेक्षा असली तरी, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे