पक्षीविश्व- स्वर्गीय नर्तक (इंग्लिश नाव Asian Paradise-flycatcher/ शास्त्रीय नाव Terpsiphone paradisi)

पॅराडाईज फ्लायकॅचर उर्फ स्वर्गीय नर्तक हा संपूर्ण भारतात आढळणारा पक्षी असून याच्या दोन जाती आहेत. भारतात एक आणि एक उपजात  श्रीलंकेत आढळते. हा पक्षी भारताच्या नैर्ऋत्येकडील प्रदेशातील स्थानिक असून देशातल्या उर्वरित भागात तो स्थलांतरित मोसमात दिसतो. मध्यप्रदेश राज्याचा हा ‘राज्यपक्षी’ आहे, त्याला हिंदीमध्ये ‘दूधराज’ आणि ‘सुल्ताना बुलबुल’ अशी नावे आहेत. मध्यप्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यान तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात स्वर्गीय नर्तक मोठ्या प्रमाणावर आढळतात.

स्वर्गीय नर्तक या पक्ष्याच्या नराला लांब शेपूट असते, त्यामुळे तो अतिशय देखणा दिसतो. नर साधारणत: २० सें.मी. एवढा मोठा असतो पण त्याची शेपटीच त्याच्या शरीराच्या दुप्पट लांब असते. हा बुलबुलाच्या आकारमानाचा असून पूर्ण वाढ झालेला नर हा पांढऱ्या रंगाचा असतो. त्याचे डोके काळ्या रंगाचे असते. युवा नर आणि मादी लाल रंगाची असते. दोघांच्या डोक्यावर लहानसा तुरा असतो. डोळ्याभोवती आकर्षक निळ्या रंगाची कडी असते. बाकी सगळे शरीर हे शुभ्र चमकदार, चंदेरी पांढऱ्या रंगाचे असते आणि म्हणूनच या पक्षाला हिंदीमधे ‘दूधराज’ असे समर्पक नाव दिले आहे. याची शेपटी गोलाकार असते आणि त्यातली मधली दोन पिसे अतिशय लांब आणि एखाद्या रिबीनीसारखी तरळत असतात.

हा सुंदर पक्षी भारतात सर्वत्र सहज आढळतो. दाट जंगलांमधे थोड्या उघड्यावर, पाण्याच्या आजूबाजूला यांची वर्दळ कायम असते. दाट राई, बागा, नाल्याभोवतालची झाडे, बांबूंच्या जंगलात तो राहतो. तसेच शहरात घरांभोवतालच्या गर्द झाडीमध्येही स्वर्गीय नर्तक आढळतो. हा पक्षी कीटकभक्षी आहे. माशा, डास, फुलपाखरे इत्यादी कीटक हे त्याचे अन्न आहे. पॅराडाईज फ्लायकॅचर या नावाप्रमाणेच हा पक्षी कायम हवेत उड्या मारून, सूर मारून माश्या, किटक, फुलपाखरे पकडत असतो.

हे पक्षी साधारणपणे जोडीने असतात. यांचा विणीचा हंगाम साधारणत: मार्च ते जुलै महिन्यात असतो. या काळात नर हे हद्दप्रिय असतात आणि ते त्यांची घरट्याची जागा जिवापाड जपतात. या काळात ते खास शिळ घालून मादीला आकर्षित करतात. ते मादी समोर नृत्य ही करतात, या कामी त्यांची आकर्षक लांब शेपटीसुद्धा कामी येते. हे पक्षी पातळ गवताची पाती व धागे गुंफुन सुबक वाटीच्या आकाराचे घरटे बांधतात. नर मादीची जोडी जमल्यावर दोघे मिळून घरटे बांधतात. हे घरटे सहसा जमिनीपासून ६/८ फुटांवर बांधले जाते. या घरट्याला मुलायमपणा येण्यासाठी कोळ्याच्या जाळ्याचे तंतू, रेषमासारखे धागे वापरले जातात. मादी त्यात ३/५ पांढरट, गुलाबी अंडी घालते. ही अंडी उबवण्याचे काम आणि पिल्लांचे पालनपोषण दोघेही नर मादी करतात.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा