अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने बदलले नियम, उमेदवाराला मिळणार नऊ हजार प्रतिनिधींची यादी

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर २०२२: शशी थरूर, कार्ती चिदंबरम, मनीष तिवारी यांच्यासह पाच काँग्रेस खासदारांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना समाविष्ट असलेल्या सर्व ९ हजार मतदारांची यादी पाहण्यास मिळेल. ही यादी २० सप्टेंबरपासून पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडे उपलब्ध होईल.

तसेच या निवडणुकीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नेत्यांना त्यांच्या प्रदेश काँग्रेस कार्यालयात राज्यातील १० प्रतिनिधींची यादी पाहता येईल. उमेदवारी अर्ज दाखल करून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द होताच नेत्यांना प्रतिनिधींची संपूर्ण यादी मिळेल. उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुक नेते या यादीतून त्यांचे १० समर्थक निवडू शकतात आणि त्यांची स्वाक्षरी करून पाठिंबा मिळवू शकतात. त्यानंतर २४ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल.

मतदान यादीशिवाय काँग्रेस अध्यक्षपदासाठी निष्पक्ष निवडणुका कशा होतील? असे म्हणत असंतुष्ट G-२३ नेत्यांचे सदस्य मनीष तिवारी यांनी काँग्रेस संघटना निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले होते.

गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसमधून अनेक बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत, अशा परिस्थितीत राहिलेल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष प्रमुखांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जाते.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा