पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लक्षवेधी ठरणाऱ्या हिंजवडी जिल्हा परिषद गटात यंदा मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे! हा गट पुन्हा एकदा सर्वसाधारण (खुला) राहिल्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी लगबग सुरू झाली आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गज या गटातून आपले मनसुबे पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळशी तालुक्यात, अलीकडेच काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मातब्बरांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद लक्षणीय वाढली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत शिवसेनेचा (उद्धवसेना) गट देखील निर्णायक ताकद दाखवण्यासाठी सज्ज असल्याने, महायुती न झाल्यास या मतदारसंघात तिरंगी लढत निश्चित मानली जात आहे.
सध्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर आणि भाजपचे माजी आमदार संग्राम थोपटे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
मुळशीतील तीन जिल्हा परिषद गटांत आणि सहा पंचायत समिती गणांमध्ये या आजी-माजी आमदारांचे वर्चस्व सिद्ध करण्याची ही कसोटी ठरणार आहे. विशेषतः ७५ हजार हून अधिक मतदारसंख्या असलेल्या आणि हिंजवडी गणाचा निर्णायक प्रभाव असलेल्या या गटात वर्चस्वासाठी मोठा संघर्ष उभा राहिला आहे.
कार्यकर्त्यांनी आपले गड मजबूत करण्यासाठी ग्रामभेटी आणि जनसंपर्क सुरू केला आहे. पक्षनिष्ठेसोबतच व्यक्तिगत जनसंपर्कावर विशेष भर दिला जात आहे.
योग्य, विजयी उमेदवार निवडण्याचे कठीण समीकरण पक्ष नेतृत्वाला मांडावे लागणार आहे, कारण तिकीट न मिळाल्यास पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागण्याची भीती सर्वच पक्षांना आहे. युती-आघाडी होणार की सर्व पक्ष स्वतंत्र लढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































