पुणे : मराठेशाहीच्या देदिप्यमान इतिहासाचा विषय निघाला की पेशव्यांचा उल्लेख हा अनिवार्यच ठरतो. त्यामध्येही थोरले बाजीराव आणि मस्तानी हा कायमच अनेकांच्या चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय राहिला आहे.
पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवार वाडा नाव ऐकलं तरी संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. अशी काहीशी शनिवरवाड्याची ओळख आहे. या ऐतिहासिक शनिवार वाड्याला सोमवारी (दि.६) दुपारच्या सुमारास मस्तानीच्या अकरा वंशजांनी भेट दिली. यावेळी शनिवारवाड्यावर इतिहास पुन्हा जागा झाल्यासारखे वाटले.
मध्यप्रदेश येथे राहणारे मस्तानीचे वंशज सातवी आणि आठवी पिढी मस्तानीवर आधारित एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते.
यावेळी त्यांनी शनिवार वाड्याला भेट देवून मस्तानीच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मस्तानी यांचे वंशज नवाब इरफान अली बहादूर, तमकीन अली जोश बहादूर, झुबेर अली जोश बहादूर, दरुकीन अली बहादूर, उस्मान अली बहादूर, सना अली बहादूर, फिरोजा सुल्तान, उजरे अली बहादूर, अल्मास बहादूर यांनी सोमवारी शनिवारवाड्याला भेट दिली.
बहादूर कुंटुंबातल्या सदस्यांनी एवढ्या मोठया संख्येने एकत्र येवून पहिल्यांदाच शनिवारवाडा पाहिला. तर पुण्यात आल्यावर भरपूर प्रेम मिळाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी पाबळ येथील मस्तानीच्या समधीलही भेट दिली.असे त्यांनी सांगितले.