पाकची नापाक चाल

11
Pakistan-backed conspiracy
पाकची नापाक चाल

भागा वरखाडे,न्यूज अनकट प्रतिनिधी

पहलगाममधील हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे, हे सांगण्यासाठी कुणाही ज्योतिषाची गरज नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये या हल्ल्याचा कट शिजला आहे. प्रथमच हमासच्या अतिरेक्यांनी पाकिस्तान आणि भारतातील काही अतिरेक्यांना प्रशिक्षण दिल्याची बाब उघडकीस आलीआहे. भारत आता कठोर कारवाई करणार, हे लक्षात येताच पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची तयारी दाखवली; परंतु त्यातही नापाक चाल खेळली. त्याच्या या चालीला चीननेही साथ दिली आहे. भारताने कायम अन्य देशांचा संबंध नाकारला असताना पाकिस्तान मात्र मुद्दाम भारताकडून होणारा हल्ला टाळण्यासाठी ही चाल खेळत आहे.

पहलगाम हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने हाती घेतली आहे. या तपास यंत्रणेच्या हाती अनेक पुरावे आले आहेत. त्यात पाकिस्तानमधील दहशतवादी आणि तिथल्या गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काश्मीरमध्ये पर्यटकांवर कधीच हल्ले झाले नाहीत. शिवाय धर्म विचारून हल्ला केल्याचे हे पहिलेच उदाहरण असून हमाससारखे हे कृत्य आहे. पहलगामच्या घटनेनंतर लगेच हमास आणि पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या संबंधाची चर्चा सुरू झाली होती. आता ‘एनआयए’च्या हाती अनेक पुरावे सापडले आहेत. त्यापैकी दोन पुरावे अतिशय महत्त्वाचे आहेत. ‘एनआयए’ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत प्रत्यक्षदर्शी आणि पीडितांनीही हल्ल्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या एका पथकाने बैसरन खोऱ्यातून दहशतवादी हल्ल्याचे पुरावे गोळा केले. एका पथकाने स्थानिक लोकांची चौकशी केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ला पाकिस्तानस्थित ‘लश्कर-ए-तौयबाने (एलईटी) केला होता.

जंगलातून दहशतवादी बैसरन खोऱ्यात पोहोचले. पहलगामला येण्यासाठी दहशतवाद्यांनी वीस तासांहून अधिक पायी प्रवास केला. दुकानांच्या मागून दोन दहशतवादी बाहेर आले आणि पर्यटकांमध्ये घुसले. त्यांनी पर्यटकांना कलमा पठण करण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्यावर दहशतवाद्यांनी चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली. तीन-चार जणांना गोळ्या लागल्याने पर्यटकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. जीव वाचवण्यासाठी ते इकडे तिकडे धावू लागले, तेव्हा आणखी दोन दहशतवादी आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. आदिल ठोकरने दहशतवाद्यांना बैसरन खोऱ्यात आणले होते. त्यानेच दहशतवाद्यांना दरीकडे जाणाऱ्या जंगलाच्या वाटेबद्दल सांगितले. आदिल ठोकर हा काश्मीरचा रहिवासी आहे. पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर चारही दहशतवादी जंगलातून पळून गेले. दहशतवाद्यांनी पळून जाण्यापूर्वी दोन पर्यटकांचे स्मार्टफोनही हिसकावले. चारही दहशतवाद्यांनी लष्कराचा गणवेश परिधान केला होता आणि त्यांच्या कपड्याला कॅमेरे जोडलेले होते.

या कॅमेऱ्यांद्वारे ते हल्ल्याचे व्हिडीओ बनवत होते. हे कॅमेरे खांद्यावर लावण्यात आले होते. दहशतवाद्यांच्या हातात विदेशी शस्त्रे होती. चारही दहशतवाद्यांनी एके-४७ रायफलने गोळीबार केला. तेथे एक अमेरिकन बनावटीची एम ४ असॉल्ट रायफलदेखील होती, त्यातील काडतुसे सापडली आहेत. ‘एनआयए’ला दहशतवादी हल्ल्याचा व्हिडीओ मिळाला असून, तो महत्त्वाचा पुरावा आहे. गोळीबार होत असताना एका फोटोग्राफरने गुपचूप झाडावर चढून शूटिंग केले. त्याचा पुरावाही ‘एनआयए’च्या हाती आला आहे. पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असताना पाकिस्तान मात्र कांगावा करतो आहे.

भारताने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा आंतरराष्ट्रीय सूर गायला सुरुवात केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात रशिया आणि चीनचा समावेश करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात रशिया आणि चीनला सहभागी करून घेऊ इच्छित आहे. पहलगाम हल्ल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची आलेली प्रतिक्रिया पाकिस्तानने पाहिली नसावी. पुतीन यांनी भारताच्या मागे राहण्याची ठाम भूमिका घेतली आहे. चीनने मात्र अगोदर पहलगाम कारवाईचा निषेध केला आणि आता पाकिस्तानची तळी उचलली आहे. पुलवामा येथे २०१९ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा पहलगामचा हल्ला सर्वात प्राणघातक हल्ला आहे. पाकिस्तानची लष्कराच्या प्रॉक्सी ग्रुप ‘टीआरएफ’ने ही जबाबदारी घेतली होती. पाकिस्तानस्थित प्रतिबंधित संघटना ‘लश्कर-ए-तोयबा’ (एलईटी) ची फ्रंट संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पहलगाम हल्ल्यातील ‘गुन्हेगार आणि सूत्रधारांना’ चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, की मला वाटते की रशिया किंवा चीन किंवा अगदी पाश्चिमात्य देशही या संकटात खूप सकारात्मक भूमिका बजावू शकतात आणि ते एक तपास पथकदेखील तयार करू शकतात. त्यात भारत किंवा मोदी खोटे बोलत आहेत, की ते याची चौकशी करण्याचे काम सोपवले पाहिजे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय चौकशीचा प्रस्ताव दिला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही आंतरराष्ट्रीय चौकशीचा प्रस्ताव दिला आहे. “भारतात, काश्मीरमध्ये या घटनेला कोण जबाबदार आहे आणि कोण घडवून आणत आहे ते शोधा,”असे त्यांनी म्हटले आहे.

एकीकडे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान भारताशी युद्ध करण्याची भाषा बोलत असताना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मात्र त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी तर अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी हल्लेखोरांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हटले. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानने भारताचे आरोप नाकारले आहेतच; परंतु उच्च अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारकपणे स्वत: ला दोष देणारे दोन दावे केले आहेत. उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी काहीही म्हटले असले, तरी अमेरिकन विश्लेषकाने पाकिस्तानचा डाव उघड केला. ‘काश्मीर संघर्षावर कोणाचेही मत असले, तरी पर्यटकांचे हत्याकांड हे निर्विवादपणे दहशतवादाचे कृत्य आहे. गुन्हेगार ‘स्वातंत्र्यसैनिक’ असू शकतात, हा समज जगभरातील एक सामान्य गैरसमज आहे.’

संरक्षण मंत्री या प्रकरणाला ला खोटा देखावा मोहीम म्हणतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या एका उच्च अधिकाऱ्याने केलेला दुसरा स्व-बदनामी दावा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. दार आणि आसिफ काय म्हणाले यावर अधिक विचार केल्यावर, दोघांतील एक स्पष्ट विरोधाभास लक्षात येईल. पहिल्याने पहलगाम हल्ल्याला मान्यता दिली आहे, तर दुसऱ्याने हल्ल्याला ठामपणे नकार दिला आहे आणि त्यासाठी भारताच्या माथी खापर फोडले आहे. हे त्यांच्या बाजूची गुंतागुंत लपवण्याचा अनाठायी प्रयत्न सूचित करते. एकीकडे काश्मीरमधील या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप भारत करत असताना दुसरीकडे पाकिस्तानने या प्रकरणाची स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या या टिप्पणीवर भारताकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्याचवेळी चीनने या प्रकरणावर बारीक नजर ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानने बाह्य हस्तक्षेपाची मागणी केली. भारत-पाकिस्तान वादात भारत नेहमीच तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाच्या विरोधात आहे. १९७२ च्या शिमला करारात असेही म्हटले होते, की दोन्ही देशांमधील कोणत्याही प्रकारचा वाद परस्पर सोडवला जाईल. २०१६ मध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी पंजाबमधील पठाणकोट हवाई दलाच्या तळावर केलेल्या हल्ल्यादरम्यान, भारताने पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाला (जेआयटी) हल्ल्याच्या ठिकाणी भेट देण्याची आणि हल्ल्याशी संबंधित पुरावे गोळा करण्याची परवानगी दिली होती. अशा परिस्थितीत, भारत या प्रकरणात कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीला परवानगी देण्याची अजिबात शक्यता नाही. या प्रकरणात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची पाकिस्तानची मागणी हा त्याचा डाव आहे. यामुळे भारताला कोणतीही कारवाई करण्यास उशीर होईल आणि तणाव कमी होण्यासही वेळ मिळेल. पाकिस्तान आधीच एकाकी पडला आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर अनेक देश भारताला पाठिंबा देतात.

दुसरीकडे, पाकिस्तानला भारताशी युद्ध करून कोणताही धोका पत्करायचा नाही. अशा परिस्थितीत तो अशा प्रकारे युद्ध टाळू शकतो. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार पाकिस्तानविरोधात झटपट कारवाई करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष तपासाच्या पाकिस्तानच्या मागणीला चीनचा पाठिंबा मिळाला आहे. चीनी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्य वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर आपण लक्ष ठेवून असल्याचे चीनने म्हटले आहे.