रणवीर अलाहाबादिया-विवाद : समय रैनाची पहिली प्रतिक्रिया, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ चे सर्व एपिसोड्स हटवले!

25

पुणे १३ फेब्रुवारी २०२५: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि कॉमेडियन समय रैना हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील एका विवादित प्रश्नामुळे सोशल मीडियावर रणवीरवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या वादानंतर रणवीरने जाहीर माफी मागितली असली, तरी प्रकरण चिघळत असल्याचे दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणावर समय रैनाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये युट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहाबादिया हे परीक्षक म्हणून सहभागी झाले होते. शोदरम्यान रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला. त्या स्पर्धकाला त्याच्या आई-वडिलांच्या प्रायव्हसीवर आधारित अयोग्य पर्याय निवडण्यास भाग पाडण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर रणवीरवर संताप व्यक्त केला गेला.

समय रैनावरही चौफेर टीका

हा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैनानेही विनोदाच्या स्वरूपात प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे रणवीरप्रमाणेच समयलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी दोघांविरोधात संताप व्यक्त करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यानंतर या प्रकरणात मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

समय रैनाची पहिली प्रतिक्रिया : ‘हे हाताळणं अवघड जात आहे’

वाद वाढत असताना समय रैनाने अखेर मौन सोडत एक मोठा निर्णय घेतला. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व एपिसोड्स युट्यूबवरून हटवले असल्याचे जाहीर केले.

“सध्या जे काही चाललंय ते हाताळणं माझ्यासाठी अवघड होत आहे. त्यामुळे मी ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व एपिसोड्स हटवले आहेत. या शोचा उद्देश केवळ लोकांना हसवण्याचा होता, कोणालाही दुखावण्याचा नव्हता. तरीही जर कुणाला दुखापत झाली असेल, तर मला खेद आहे. तसेच मी पोलिस तपासात पूर्ण सहकार्य करेन,” असे समय रैनाने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.

रणवीरवर चौकशी सुरू, सेलिब्रिटी आणि नेत्यांकडून टीका

या प्रकरणावर आता राजकीय नेते आणि अनेक सेलिब्रिटींनीही रणवीरवर टीका केली आहे. “विनोदाच्या नावाखाली अश्लीलता पसरवली जात आहे. त्यामुळे रणवीरवर योग्य कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी अनेकांनी केली आहे.

या वादानंतर रणवीरने जाहीर माफी मागितली असली तरी प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. पोलिसांच्या चौकशीनंतर आता या प्रकरणाची पुढील दिशा काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा