Rising Childhood Obesity in India: एका बाजूला कुपोषणाची गंभीर समस्या असताना, दुसरीकडे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, पाच वर्षांखालील मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण २०१९-२१ मध्ये ३.४ टक्के होतं, पण आता ते दुप्पट झालं आहे. विशेष म्हणजे, ज्या वयात मुलांच्या खाण्याच्या सवयी आणि आवडी-निवडी तयार होतात, त्याच वेळी त्यांना चुकीच्या आहाराची सवय लागणं चिंतेची बाब आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची अनेक कारणं आहेत. यात प्रामुख्याने अयोग्य आणि असंतुलित आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, अपुरी झोप आणि काहीवेळा आनुवंशिक कारणंही असू शकतात. आजकाल मुलं जंक फूड, तेलकट आणि गोड पदार्थांचं जास्त सेवन करत आहेत, ज्यात कॅलरीज जास्त असतात पण पोषक तत्वं कमी असतात.
यासोबतच, मुलांमध्ये टीव्ही बघत किंवा मोबाईलमध्ये गुंतून जेवण करण्याची सवय वाढली आहे. अनेक लहान मुलं अगदी एक वर्षांपासूनच पॅकेटबंद आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याचा हट्ट करतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. डॉ. लक्ष्मण कार्ले यांनी सांगितलं की, लहान वयात लागलेल्या या सवयी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. लठ्ठपणामुळे मुलं नैराश्यात येऊ शकतात, ज्यामुळे ते जास्त खातात किंवा पूर्णपणे जेवण सोडतात. त्यामुळे, मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी योग्य वयातच जाणीवपूर्वक आणि पोषक आहारावर आधारित असणं खूप गरजेचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे